अलीकडच्या काळातील अभिनेत्री आपल्या फिटनेसवर सर्वाधिक मेहनत घेत असतात. आपलं आरोग्य सुदृढ कसं राहील याकडे या अभिनेत्रींचं जास्तीत जास्त लक्ष असतं. याशिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून शिल्पा शेट्टी, ऐश्वर्या नारकर, माधवी निमकर यांसारख्या अभिनेत्री नेहमी योग साधनेमुळे आयुष्यात कसा बदल होतो, आपण फिट कसे राहू शकतो याची माहिती चाहत्यांना देत असतात. आता या क्षेत्रात प्रशिक्षण घेऊन लोकप्रिय मराठी अभिनेत्री योग प्रशिक्षक बनली आहे. याबद्दल तिने इनस्टाग्राम पोस्ट शेअर करत माहिती आहे.

मराठी मालिकाविश्वातून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणून तितीक्षा तावडेला ओळखलं जातं. गाजलेल्या मालिकांमध्ये काम केल्याने तिचा एक वेगळा चाहतावर्ग तयार झालेला आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर सुद्धा कायम सक्रिय असते. कामाव्यतिरिक्त आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी तितीक्षा चाहत्यांबरोबर शेअर करते. तिचे युट्यूब ब्लॉग्स देखील सर्वांच्या पसंतीस उतरतात.

सध्या तितीक्षा एका खास गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. ही लोकप्रिय अभिनेत्री आता योग प्रशिक्षक झाली आहे. याबद्दल तिने स्वत: इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. या योग अभ्यासाने आयुष्याला कलाटणी मिळाली असं मत अभिनेत्रीने व्यक्त केलं आहे.

अभिनेत्री लिहिते, “आता मला अधिकृत प्रमाणपत्र मिळालं आहे… मी प्रचंड कृतज्ञ आहे. सराव, प्रशिक्षण ते आपलं उद्दिष्ट गाठण्यापर्यंतचा हा प्रवास आपलं जीवन बदलणारा आहे. या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत होते. आता मी प्रमाणित ‘हठ योग प्रशिक्षक’ आहे. या प्रवासाबद्दल माझ्या शिक्षकांचे व मित्रमंडळींचे खूप खूप आभार…”

तितीक्षाने प्रशिक्षण घेतलेल्या ‘हठ योग’चा अर्थ ‘ह’ म्हणजे सूर्य आणि ‘ठ’ म्हणजे चंद्र असा होतो. हा श्वासोच्छवासाचा शास्त्रोक्त अभ्यास आहे. याने मनाची एकाग्रता सुद्धा वाढण्यास मदत होते. तितीक्षा तावडेने शेअर केलेल्या पोस्टवर तिचा पती सिद्धार्थ बोडके याच्यासह ऋतुजा बागवे, ऐश्वर्या नारकर, अक्षया नाईक, मुग्धा गोडबोले, सुयश टिळक, अविनाश नारकर, हृता दुर्गुळे यांनी कमेंट्स करत अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, तितीक्षा तावडेच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, तिची प्रमुख भूमिका असलेल्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेने डिसेंबर महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता अभिनेत्री भविष्यात कोणत्या नव्या प्रोजेक्टमध्ये झळकणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Story img Loader