Titeeksha Tawde And Siddharth Bodke Engagement : अभिनेत्री तितीक्षा तावडे आणि ‘दृश्यम २’ फेम अभिनेता सिद्धार्थ बोडके यांनी काही दिवसांपूर्वीच केळवणाचा फोटो शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली सोशल मीडियावर दिली होती. यानंतर अभिनेत्रीने युट्यूबवर प्रपोजल व्हिडीओ देखील शेअर केला होता. त्यामुळे तितीक्षा व सिद्धार्थ या दोघांचेही चाहते त्यांचा साखरपुडा व लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर दोघांनीही आज ( २५ फेब्रुवारी ) गुपचूप साखरपुडा उरकत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
तितीक्षा-सिद्धार्थचा साखरपुडा जवळचे नातेवाईक, कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत पार पडला आहे. या जोडप्याच्या जवळच्या मैत्रिणीने सगळ्यात आधी साखरपुड्याचा फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी सर्वांना दिली.
हेही वाचा : “आता मराठीत कुणीच सुपरस्टार नाही, पण…”, गश्मीर महाजनीची पोस्ट चर्चेत; म्हणाला, “जो रस्त्यावरून…”
तितीक्षाने या समारंभात फिकट जांभळ्या रंगाची ( लेव्हेंडर ) डिझाइनर साडी नेसली होती. तर, सिद्धार्थने ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी परिधान केल्याचं या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. साखरपुड्याचे फोटोंना या जोडप्याने ‘Forever with my best friend’ असं कॅप्शन दिलं आहे. सध्या मराठी कलाविश्वातून या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. ऐश्वर्या व अविनाश नारकर, तन्वी मुंडले, ऋतुजा बागवे अशा कलाकारांनी या दोघांच्या साखरपुड्याच्या फोटोंवर खास कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा : “वऱ्हाड निघालं…”, पूजा सावंत पाठोपाठ तितीक्षा तावडेची लगीनघाई, समोर आले मेहंदी सोहळ्याचे फोटो
दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून तितीक्षा-सिद्धार्थच्या डेटिंगच्या चर्चा सोशल मीडियावर चालू होत्या. अखेर ८ फेब्रुवारीला एकत्र फोटो शेअर करत या जोडप्याने इन्स्टाग्रामवर प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. आज ( २५ फेब्रुवारी ) गुपचूप साखरपुडा उरकल्यानंतर तितीक्षा तावडे लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचं सांगितलं जात आहे.