‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम अभिनेत्री तितीक्षा तावडे आणि ‘दृश्यम २’ फेम अभिनेता सिद्धार्थ बोडके यांचा लग्सोहळा २६ फेब्रुवारी रोजी थाटामाटात पार पडला. इन्स्टाग्रामवर केळवणाचा फोटो शेअर करत तितीक्षाने प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर साखरपुडा, मेहंदी, हळद अशा विधी सर्व सोहळ्यांनतर दोघांनी लग्न केलं.
तितीक्षाने तिच्या मेहेंदीचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात ती जांभळ्या रंगाच्या लेहेंग्यामध्ये दिसत आहे. या फोटोंमध्ये तितीक्षा कमालीची सुंदर दिसत आहे. तिचा जांभळा लेहेंगाही छान दिसतोय. या फोटोला तिने मेहेंदी आणि हार्ट इमोजीचं कॅप्शन दिलं आहे. अलीकडे अभिनेत्री पारंपरिक रंगांऐवजी वेगळ्या रंगाना पसंती देताना दिसत आहेत. अलीकडेच अभिनेत्री पूजा सावंतनेसुद्धा तिच्या हळदीत पिवळ्या रंगाऐवजी जांभळ्या रंगाचा लेहेंगा घातला होता.
तितीक्षाने मेहेंदी लूक साठी मिनिमल मेकअप आणि ज्वेलरीची निवड केली होती. मोत्यांचा लहान हार, त्याबरोबर मॅचिंग कानातले आणि टिकलीने तिने लूक पूर्ण केला होता. तितीक्षाने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये तितीक्षा, तिची बहीण आणि भाचा तिघंही हसताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये तितीक्षा तिच्या आई वडिलांबरोबर दिसत आहे. तितीक्षाच्या आईनेही मेहेंदी काढल्याचं दिसत आहे. या फोटोजमध्ये तितीक्षाचं लग्नघर सजलेलं दिसत आहे.
दरम्यान, तितीक्षाच्या कामाबद्दल सांगायच झाल्यास, ती ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत सध्या काम करतेय. लग्नानंतर सात दिवसांनी म्हणजे आज तितीक्षाने पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. मालिकेतील सह कलाकारांनी तितीक्षासाठी केक आणून तिचं सेटवर जोरदार स्वागत केलं.