‘ध्रुव तारा’ फेम तृतीयपंथी अभिनेत्री शुभी शर्माचा अपघात झाला आहे. अपघात झाल्याने नवीन वर्षानिमित्त पार्टी करू शकली नाही, असं शुभीने सांगितलं. तिचा ३१ डिसेंबर रोजी अपघात झाला. डॉक्टरांनी तिला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. ज्याच्यामुळे अपघात झाला, त्याने माफी मागितल्याने पोलिसांत तक्रार न दिल्याचं तिने सांगितलं.
ती म्हणाली, “मी आता बरी होत आहे, मी यावेळी नवीन वर्ष साजरं केलं नाही कारण ३१ डिसेंबरला सकाळी माझा अपघात झाला. दुचाकीवरून आलेल्या एका व्यक्तीने मला धडक दिली आणि पळून गेला. नंतर पोलिसांनी मला मदत केली. आणि त्या व्यक्तीने माफी मागितली. मी यासंदर्भात कोणतीही तक्रार दाखल केली नाही. मला नवीन वर्षाची सकारात्मक सुरुवात करायची होती.”
बाप्पाचे आशीर्वाद घेऊन वर्षाची सुरुवात
ती पुढे म्हणाली, “मी हॉस्पिटलमध्ये गेले आणि माझ्या सर्व चाचण्या करण्यात आल्या. देवाच्या कृपेने सगळे रिपोर्ट नॉर्मल होते. डॉक्टरांनी मला फक्त थोडी विश्रांती घ्यायला सांगितलं. त्यामुळे मी नवीन वर्षाची पार्टी केली नाही. मी २०२५ ची सुरुवात सिद्धी विनायक मंदिरात बाप्पाचे आशीर्वाद घेऊन केली.”
नवीन वर्ष दरवर्षी खास असतं, असं शुभीने सांगितलं. “नवीन वर्षाचा पहिला दिवस माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी माझ्या आईचा वाढदिवस असतो. मी तिच्या खूप जवळ आहे. माझ्या कुटुंबातील ती एकमेव व्यक्ती आहे जिने मला स्वीकारलं. ती माझ्यासाठी जगाशी लढली. मी तिची आभारी आहे आणि तिने माझ्यासाठी जे केलं ते मी कधीही विसरणार नाही,” असं ती म्हणाली. यासंदर्भात ई-टाइम्सने वृत्त दिलं आहे.
हेही वाचा – “खोटं बोलून, माझं नाव वापरून…”, अंकिता प्रभू वालावलकर भडकली; म्हणाली, “आमच्या लग्नासाठी…”
टीव्हीवर बरंच काम केल्यानंतर आता चित्रपट, वेब सीरिज व रिअॅलिटी शोकडे वळायचं आहे, असं शुभीने सांगितलं. तसेच तिला टीव्हीवर मुख्य भूमिका करायची आहे. निर्माते तृतीयपंथी कलाकारांचा विचार करतील, अशी आशा तिने व्यक्त केली.
अभिनेत्री शुभी शर्माने ‘आयना-रूप नहीं हकीकत भी दिखे’ या टीव्ही शोमध्ये झळकली होती. तसेच तिने ‘चांद जलने लगा’ मध्ये चंदाची भूमिका साकारून प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. तिने ‘साथ निभाना साथिया’, ‘मन की आवाज प्रतिज्ञा 2’, ‘सावी की सावरी’, ‘नथ’, ‘इश्क की दास्तान – नागमणी’ यासह अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.