ट्रान्सजेंडर महिला आणि कार्यकर्ती नीरजा पुनिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एमटीव्हीच्या प्रसिद्ध शो रोडीजमधून पुढे आलेल्या नीरजा पुनियाने नुकत्याच तिच्याबरोबर घडलेल्या एका वाईट प्रसंगाबद्दल माहिती दिली आहे. ६ नोव्हेंबरच्या रात्री तिच्याबाबतीत असे काही घडले, जे ती कधीही विसरू शकत नाही. ट्रान्सजेंडर असल्या कारणाने नीरजाला त्या रात्री तिला तिच्या आवडत्या ढाब्यावर जाण्यापासून रोखण्यात आले. यामुळे ती चांगलीच अस्वस्थ झाली.
नीरजा पुनियाने ढाबा मालकावर छळवणूक केल्याचा आरोपही केला आहे. नीरजा पुनिया ही हरियाणाची रनवे मॉडेल आहे. नीरजा म्हणाली, “श्री राम ढाबा हे माझे अत्यंत आवडते ठिकाण आहे. या ठिकाणी आम्ही बऱ्याचदा चहा प्यायला जातो. मात्र, त्या रात्री (६ नोव्हेंबर) ढाब्याच्या मालकाने मला आत जाण्यापासून रोखले. केवळ मी ट्रान्सजेंडर असल्यामुळे त्यांनी माझी अडवणूक केली.”
आणखी वाचा : सलमान खानचा ‘टायगर ३’ न पाहण्याची चार कारणं कोणती? जाणून घ्या
“तुम्ही इथे येऊन तुमचा धंदा (व्यवसाय) करू नका आणि कृपया आजपासून इथे येणं बंद करा” हे त्या त्या ढाब्याच्या मालकांचे शब्द असल्याचंही नीरजाने स्पष्ट केलं. नीरजा पुढे म्हणाली, “ढाब्याच्या मालकाने मी सेक्स वर्कर असल्याचे गृहीत धरले. बऱ्याच ट्रान्सजेंडर लोकांबद्दल सामान्यांमध्ये हा गैरसमज आहे, जो समाजासाठी अत्यंत हानिकारक आहे. मी मॅनेजरला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु तरी त्यांनी मला तिथून निघून जाण्यास सांगितले.”
मालकाने अशी वागणूक दिल्याने नीरजाला तिथेच पॅनिक अटॅक येत होते. तरी तिने कसंबसं स्वतःला सावरलं. नीरजाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही याबद्दल पोस्ट करत लिहिलं. “मी ट्रान्स आहे, तुमच्या पितृसत्ताक विचारांमध्ये गुरफटलेली सामान्य स्त्री नाही. मी स्वतःशी, माझ्या कुटुंबाशी आणि नंतर समाजाशी लढले, तुझे गैरवर्तन मी सहन करेन असे वाटले तरी कसे तुला?” नीरजाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. बऱ्याच लोकांनी नीरजाच्या धाडसाचे कौतुक केले आहे आणि समाजाच्या विकृत मानसिकतेवर ताशेरे ओढले आहेत.