Marathi Serial TRP : छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यांपासून अनेक नवनवीन मालिका चालू झाल्या आहेत. टीआरपीच्या शर्यतीत आपलं स्थान कायम ठेवण्यासाठी वाहिन्यांकडून नेहमीच विविध प्रयत्न केले जातात. मालिकांमध्ये नव्या कलाकारांची एन्ट्री, रंजक कथानक, कथानकात येणारे लीप यामुळे प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन होत असतं. मालिकांची लोकप्रियता ही त्यांच्या टीआरपीवरून ठरत असते. त्यामुळे दर आठवड्यात कोणती मालिका बाजी मारणार याकडे प्रेक्षकांसह कलाकारांचं लक्ष असतं.
गेल्या दीड वर्षांपासून ‘स्टार प्रवाह’ वाहिनीची ‘ठरलं तर मग’ मालिका ही टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या स्थानावर आहे. या आठवड्यात सुद्धा या मालिकेने आपलं पहिलं स्थान कायम राखलं आहे. यानंतर या यादीत ईशा केसकरच्या ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेचा क्रमांक लागतो. तर, तिसऱ्या – चौथ्या स्थानी अनुक्रमे ‘प्रेमाची गोष्ट’ व ‘थोडं तुझं थोडं माझं’ या मालिका आहेत. याशिवाय पाचव्या स्थानावर विशाल निकम व पूजा बिरारी यांची ‘येड लागलं प्रेमाचं’ ही मालिका आहे.
हेही वाचा : अवघ्या दोन महिन्यांत ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची एक्झिट! कारण सांगत शेअर केली पोस्ट…
‘झी मराठी’ वाहिनीवर या ( जुलै ) महिन्याच्या सुरुवातीला ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका चालू झाली. ही मालिका रात्री ८.३० वाजता ‘ठरलं तर मग’च्या स्लॉटला प्रसारित केली जाते. त्यामुळे या मालिकेचा टीआरपी किती असणार याकडे प्रत्येकाचं लक्ष होतं. गेल्या आठवड्यात सूर्या दादाची ही मालिका २० व्या स्थानी होती. तर या आठवड्यात TRP च्या शर्यतीत ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका २२ व्या स्थानावर आहे.
TRP च्या शर्यतीमधील टॉप – १५ मालिका
१. ठरलं तर मग
२. लक्ष्मीच्या पाऊलांनी
३. प्रेमाची गोष्ट
४. थोडं तुझं थोडं माझं
५. येड लागलं प्रेमाचं
६. घरोघरी मातीच्या चुली
७. लक्ष्मीच्या पाऊलांनी – महाएपिसोड
८. साधी माणसं
९. अबोली
१०. मन धागा धागा जोडते नवा
११. शुभ विवाह
१२. सुख म्हणजे नक्की काय असतं
१३. मुरांबा – महाएपिसोड
१४. शिवा
१५. पारू
दरम्यान, टॉप १५ मालिकांच्या यादीत झी मराठी वाहिनीच्या केवळ ‘पारू’ व ‘शिवा’ या दोन मालिका आहेत. अक्षरा-अधिपतीची ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत १७ व्या स्थानावर आहे. तर, स्टार प्रवाहवर नव्याने सुरु झालेला ‘मी होणार सुपरस्टार – छोटे उस्ताद पर्व ३’ हा कार्यक्रम टीआरपीच्या यादीत २० व्या स्थानी आहे. टीआरपी तडका या इन्स्टाग्राम पेजवरून ही यादी शेअर करण्यात आली आहे.