सध्या मराठी मालिकाविश्वात नवनवीन मालिका सुरू होतं आहेत. तसंच जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसत आहेत. पण, यादरम्यान अशा अनेक मालिका आहेत, ज्या अवघ्या दोन-तीन महिन्यात बंद केल्या आहेत. कमी टीआरपीमुळे वाहिन्यांकडून ही पाऊल उचलली जात असल्याचं म्हटलं जात आहे. अशातच आणखी दोन लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समोर आलं आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी ‘सोनी मराठी’ वाहिनीवर हिंदी डब मालिका सुरू होताना दिसत आहेत. त्यामुळे जुन्या मालिका बंद करण्यात येत आहेत. लवकरच पाच महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आलेली ‘तू भेटशी नव्याने’ मालिका ऑफ एअर होणार असल्याचं समोर आलं आहे. ‘बेभान प्रेम हे…’ या हिंदी डब मालिकेचा प्रोमो नुकताच समोर आला. याबरोबरच या मालिकेची वेळ जाहीर झाली. १६ डिसेंबरपासून रात्री ९ वाजता ‘बेभान प्रेम हे…’ ही मालिका पाहायला मिळणार आहे. याच वेळेत सध्या ‘तू भेटशी नव्याने’ मालिका सुरू आहे. पण, आता लवकरच ही मालिका बंद होणार असल्याची माहिती मिळत आहे.
‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत अभिनेता सुबोध भावे आणि शिवानी सोनार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे. ही मालिका जुलै महिन्यापासून सुरू झाली होती. या मालिकेत पहिल्यांदाच एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. मराठी मालिकाविश्वात हे पहिल्यांदाच घडलं. पण आता ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेचा पाच महिन्यात गाशा गुंडाळला जाणार आहे.
‘तू भेटशी नव्याने’सह आणखी मालिका बंद होणार आहे. या मालिकेच नाव आहे ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’. सुहानी नाईक, विजया बाबर, वीणा जामकर, विक्रम गायकवाड असे अनेक कलाकार असलेली ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ही मालिका चांगली लोकप्रिय ठरली. २०२२पासून सुरू झालेली ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ मालिकेचे दोन पर्व पाहायला मिळाले. पण, आता मालिका शेवटच्या टप्प्यात आली आहे. लवकरच ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ ऑफ एअर होणार असल्याचं समोर आलं आहे. या महिन्यात शेवटचं चित्रीकरण होणार असून डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारीच्या सुरुवातीला ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.