सध्या विविध मराठी वाहिन्यांवर विविध धाटणीचे विषय पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांना नायक – नायिकांप्रमाणे मालिकेत नकारात्मक भूमिका कोण साकारणार याची देखील उत्सुकता सर्वांना असते. अलीकडच्या काळात प्रमुख कलाकार चाहत्यांच्या आवडीचे असतातच पण, त्याचबरोबर प्रेक्षकांना खलनायकांच्या भूमिकाही आवडतात. अशीच एक नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अभिनेता सुबोध भावे व अभिनेत्री शिवानी सोनार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. आता या मालिकेत खलनायिका म्हणून कोणती अभिनेत्री झळकणार जाणून घेऊयात…
‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत खलनायिकेच्या रुपात झळकणाऱ्या अभिनेत्रीने यापूर्वी अनेक गाजलेल्या मराठी, हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. तिने आतापर्यंत विविध प्रकारच्या भूमिका तसेच खलनायिका साकारल्या आहेत. आता लवकरच ही अभिनेत्री सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत झळकणार आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून प्रिया मराठे आहे. ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेच्या घोषणेपासूनच ही एआय मालिका नेमकी कशी असेल? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. मालिका विश्वात एआयवर आधारित असलेली ही जगभरातली पहिलीच मालिका आहे. ही मालिका येत्या ८ जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर रोज रात्री ९.०० वाजता आपल्या भेटीला येणार आहे. मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते अजय मयेकर आहेत. आता प्रियाची भूमिका नेमकी काय असेल जाणून घेऊयात…
‘तू भेटशी नव्याने’ मालिकेत प्रिया मराठे खलनायिका साकारणार आहे. रागिणी अग्निहोत्री असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. प्राध्यापिका असणारी रागिणी अभिमन्यू राजेशिर्केच्या प्रेमात पडते आणि त्याला मिळवण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असते. रागिणी काय आणि कशाप्रकारे षडयंत्र रचते? ते मालिकेत पाहायला मिळणार आहे. रागिणीच्या येण्याने अभिमन्यू आणि गौरीच्या आयुष्यात काय उलथापालथ होणार? गोड बोलून रागिणी आपला डाव कसा साधणार? हे दाखवताना प्रेमाच्या कसोटीवर कोण कसं खरं उतरणार? याची रंजक कथा मालिकेत पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा : मालिका विश्वातील पहिला ‘एआय’ प्रयोग; ‘तू भेटशी नव्याने’ मालिका आठ जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर
‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत काम करायला, त्यातही निगेटिव्ह रोल करायला प्रिया मराठे खूपच उत्सुक असून आपल्या या भूमिकेबद्दल प्रिया सांगते की, “जर त्या भूमिकेचं कथेतील महत्त्व जास्त असेल तर ती भूमिका करणं मला आवडतं. माझ्यासाठी त्या भूमिकेचं कथेतील स्थान जास्त महत्त्वाचं असतं, जेणेकरून मला तिथे अभिनयासाठी जास्त चांगला वाव मिळेल. भूमिका स्वीकारताना ती भूमिका काय आणि किती महत्त्वाची आहे याकडे माझं लक्ष असते. मालिकेत मी साकारत असलेली भूमिका खूप अनपेक्षित वळण घेऊन येणार आहे. या भूमिकेबद्दलची हीच गोष्ट मला जास्त आवडली.”