महाराष्ट्राची सर्वाधिक पसंती असलेल्या स्टार प्रवाह वाहिनीने प्रेक्षकांच्या अभिरुचीचा नेहमीच विचार करत अनेक नवनवीन कलाकृती भेटीला आणल्या आहेत, त्यामुळेच स्टार प्रवाहच्या मालिका आणि त्यातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग झाला आहे. काही दिवसांपूर्वी ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ आणि ‘तू ही रे माझा मितवा’ (Tu Hi Re Maza Mitwa) या नव्या मालिका सुरू झाल्या असून अल्पवधीतच या मालिकांना चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. २३ डिसेंबर २०२४ पासून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली ‘तू ही रे माझा मितवा’ मालिका सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
मालिकेतील अर्णव-ईश्वरी या जोडीला चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. त्यांच्यातील अनोखी केमिस्ट्री, भांडण चाहत्यांना बघायला आवडतं. यामुळे मालिकेने विशेष असा चाहतावर्ग कमावला आहे. मालिकेच्या प्रचंड मोठ्या चाहतावर्गामधील एक महिला चाहती मालिकेतील अर्णव-ईश्वरी यांना न चुकता मॅसेज करते. अशातच या महिला चाहतीने या दोघांची भेट घेतली.
नुकतीच गुढीपाडव्यानिमित्त गिरगावच्या शोभायात्रेत स्टार प्रवाहवरील मालिकेच्या काही कलाकारांनी सहभाग घेतला होता. या शोभायात्रेत तू ही रे माझा मितवा मालिकेतील अर्णव-ईश्वरी म्हणजेच अभिनेत्री शर्वरी जोग व अभिजीत आमकर हेही सहभागी झाले होते. यावेळी एक महिला चाहती गिरगावच्या शोभायात्रेतील गर्दीतून शर्वरी व अभिजीत यांची भेट घेण्यास आली. तसंच यावेळी महिला चाहतीने त्यांना काही आकर्षक भेटवस्तूही दिल्या. यावेळी शर्वरीने त्यांच्याकडून रोज येणाऱ्या मॅसेजबद्दल आभार मानले.
शिवाय भेटवस्तू दिल्यानंतर त्या महिला चाहतीने अर्णव-ईश्वरी म्हणजेच शर्वरी व अभिजीत यांची दृष्टही काढली. त्यानंतर त्यांनी दोघांचे कौतुक केले आणि शर्वरी व अभिजीत त्यांच्या मॅसेजला उत्तर देत असल्याबद्दल आभारही मानले. यानंतर अभिजीतने त्या महिला चाहतीबरोबर हटके असा सेल्फी फोटोही काढला.
स्टार प्रवाहच्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून अनेक चाहत्यांनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. त्याचबरोबर शर्वरी व अभिजीत यांच्या साधेपणाचंही कौतुक केलं आहे. तसंच अमेकांनी या माहिला चाहतीच्या कलाकारांवरील प्रेमाचंही कौतुक केलं आहे.
दरम्यान, अर्णव-ईश्वरी या दोघांची प्रेम कहाणी थोडी हटके आहे. एकमेकांच्या प्रेमात ते जितके बुडाले आहेत तितकेच ते एकमेकांचा तिरस्कारही करतात. म्हटलं तर एकमेकांशिवाय जगता येत नाही आणि म्हटलं तर एकमेकांबरोबर राहताही येत नाही. थोडक्यात, प्रेम करून कात्रीत सापडलेल्या अर्णव व ईश्वरीची हटके लव्हस्टोरी ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेतून पाहायला मिळत आहे