अभिनेत्री अभिज्ञा भावे सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेमुळे चर्चेत आहे. या मालिकेमध्ये ती साकारत असलेलं वल्ली हे पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे. तिचं हे पात्र नकारात्मक असलं तरी प्रेक्षकांना हवहवसं वाटतं. मालिकेमधील तिचा अभिनय कमालीचा आहे. नुकत्या पार पडलेल्या झी मराठी पुरस्कार सोहळ्याला अभिज्ञाने हजेरी लावली होती. यावेळी तिचा असलेला लूक विशेष चर्चेचा विषय ठरला.
अभिज्ञा आपल्या कामामुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. पण त्याचबरोबरीने यावेळी तिच्या टॅटू चर्चेचा विषय ठरला. झी मराठी पुरस्कार सोहळ्याला वन शोल्डर गाऊन तिने परिधान केला होता. यावेळी तिच्या पाठिवर असलेला गणपतीचा टॅटू उठून दिसत होता. पण हा टॅटू गोंदवून घेण्यामागचं कारण काय याबाबत अभिज्ञाने सांगितलं आहे.
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिला या टॅटूबाबत विचारण्यात आलं. तेव्हा ती म्हणाली, “सात ते आठ वर्षापूर्वी मी हा टॅटू काढला होता. मला टॅटू काढायचाच होता. देव माझ्या नेहमीच पाठिशी हवा म्हणून मी पाठिवर गणपतीचा टॅटू काढला. मी गणपतीची खूप मोठी भक्त आहे.”
आणखी वाचा – Video : ‘तू तेव्हा तशी’ मालिकेच्या ‘त्या’ सीनदरम्यान एक चूक घडली अन्…; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
“टॅटू ही अशी गोष्ट आहे जी आयुष्यभर तुझ्याबरोबर राहते. गणपती माझा आवडता आहे. जर कोणाला वाटत असेल गणपती कोण गोंदवून घेतं तर माझं म्हणणं आहे आपण ज्याच्यावर आंधळा विश्वास ठेवतो त्याचा टॅटू काढण्यात काहीच हरकत नाही.” अभिज्ञाचा हा टॅटू खरंच खूप सुंदर आहे.