‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘तुझेच मी गीत गात आहे’ आजपासून ऑफ एअर झाली आहे. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या या मालिकेचा गोड शेवट झाला आहे. मालिकेतील खऱ्या बाप-लेकीची म्हणजेच मल्हार व स्वराची भेट महाअंतिम भागात दाखवण्यात आली आहे. ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिका सुरू झाल्यापासून मल्हार व स्वराच्या भेटीची उत्सुकता प्रेक्षकांना होती आणि अखेरच्या भागात ती झाली आहे. मालिका आज बंद होत असली तरी यातील पात्र कायम प्रेक्षकांच्या मनात राहणार आहेत. अशातच मालिकेतील मल्हार अर्थात अभिनेता अभिजीत खांडकेकरने भावुक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत अभिजीत खांडकेकरसह उर्मिला कोठारे, प्रिया मराठे, तेजस्विनी लोणारी, अवनी तायवाडे, अवनी जोशी, दीप्ती जोशी, उमेश बने, पल्लवी वैद्य, शैलेश दातार अशी तगडी कलाकार मंडळी होती. या सर्व कलाकारांबरोबर घालवलेल्या खास क्षणांच्या फोटोंचा व्हिडीओ अभिजीतने शेअर करत पोस्ट लिहिली आहे. अभिनेत्याने लिहिलं, “अडीच वर्षांचा प्रवास आज अखेर संपतोय…प्रत्येक मालिकेच्या निमित्तानं कलाकारांचं एक नवं कुटुंब तयार होतं. त्यांच्या बरोबर आम्ही हसतो, रडतो, भांडतो, खिदळतो आणि अचानक एकेदिवशी आता उद्याचा कॉलटाइम येणार नाही. ‘ए तू किती वाजता उद्या?’, ‘आज डब्यात तुझ्यासाठी खास आणतेय हा..’, ‘च्यायला ट्राफिक लागला यार आज खूप’, ‘चलो चलो जल्दी घर जाना है…’ हे सगळे संवाद बंद होणार ही कल्पनाच सहन होत नाही.”

हेही वाचा – ‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये वडापाव गर्लसह झळकणार ‘ही’ लोकप्रिय इन्फ्लुएन्सर, मुनव्वर फारुकीशी होते खास संबंध

पुढे अभिनेत्याने लिहिलं, “आता हा चॅप्टर संपवून नवीन काहीतरी सुरू होईल हे सिंक इन व्हायलाच वेळ लागतो…पण आम्हा कलाकारांचं हे असंच असतं…तरीही ‘तुझेच गीत गात आहे’च्या निमित्ताने तयार झालेले हे बंध आयुष्यभरासाठी आहेत. अवनी तायवाडे, अवनी जोशी म्हणजेच स्वरा आणि पिहूने मला बापपणाचा अनुभव दिला…कांचन गुप्तेने आईसारखी माया दिली…सचिन, उमेश , शैलेश , हार्दिक , विघ्नेश , केदार , प्रथमेश, सागर, अभिजीतच्या रूपात भाऊ मिळाले…पल्लवी सारखी आदर्श वहिनी, बहीण मिळाली, प्रिया, तेजस्विनी, उर्मिलासारख्या आयुष्यभराच्या मैत्रीणी…प्रत्येकाबद्दल भरपूर लिहिता येईल…पण ते लिहिण्यापेक्षा एका कडकडीत मिठीतून जास्त नीट पोहोचेल…”

“सतिश राजवाडे सर, अजिंक्य , मधूरा , महिपाल जी, अभिजीत गुरू, वर्षा, उत्तरा, सुवर्णा ताई , संपूर्ण ट्रम्पकार्ड टीम आणि ‘स्टार प्रवाह टीम’चे मनापासून आभार…रसिक प्रेक्षकांना दंडवत…तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य नाही. ‘तुझेच मी गीत गात आहे’च्या निमित्ताने वडील आणि मुलीची शेवटी भेट होते आणि त्याचा शेवटचा भाग आज ‘फादर्स डे’च्या निमित्ताने प्रसारित झाला याहून अनोखा योगायोग अजून कुठला. पुन्हा नव्या भूमिकेतून आपल्या समोर येत राहीनच…असंच प्रेम आणि आशिर्वाद असू द्या,” असं अभिजीतने लिहिलं आहे.

हेही वाचा – “बाबा आहेस तू”, मंजिरी ओकने ‘फादर्स डे’निमित्ताने लिहिलेल्या सुंदर पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली, “मुलं मोठी झाली पण प्रसाद तू…”

अभिजीत खांडकेकरच्या या पोस्टवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “खूप प्रेम”, “तू कमाल आहेस”, “मला तुझा खूप अभिमान आहे”, “भरपूर प्रेम”, “आठवणीत राहाल आपण सर्व”, “शेवटचा भाग खूपच मस्त होता”, “आजचा भाग हृदयस्पर्शी होता”, “सर्वोत्कृष्ट अभिनेता”, “खूपच छान मालिका होती”, अशा प्रतिक्रिया चाहत्यांच्या उमटल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tujhech mi geet gaat aahe fame abhijeet khandkekar share emotional post pps