अभिनेता अभिजीत खांडकेकर, उर्मिला कोठारे, प्रिया मराठे, तेजस्विनी लोणारी, अवनी तायवाडे, अवनी जोशी, दीप्ती जोशी, उमेश बने, पल्लवी वैद्य, शैलेश दातार अशी तगडी कलाकार मंडळी असलेली ‘तुझेच मी गीत गात आहे’ आज (१६ जून) बंद झाली आहे. ‘स्टार प्रवाह’ची लोकप्रिय आणि टीआरपीमध्ये टॉप-५मध्ये असणाऱ्या या मालिकेने गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. पण आता मल्हार व स्वराच्या भेटीने मालिकेचा शेवट झाला आहे. त्यानिमित्ताने मालिकेतील कलाकार मंडळी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहित आहेत. पिहू म्हणजे बालकलाकार अवनी जोशी अनोख्या अंदाजात प्रेक्षकांचे आभार व्यक्त केले आहेत.
२ मे २०२२ला ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली. ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. मल्हार, मोनिका, वैदही, स्वरा, पिहू, निरंजन, क्षमा, विजय, विक्रम अशा सगळ्या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं. मालिकेतील नवनवीन ट्विस्टने तर प्रेक्षकांचा चांगलं खिळवून ठेवलं. त्यामुळे मालिका टीआरपीच्या शर्यतीत कधी दुसऱ्या स्थानावर, कधी तिसऱ्या स्थानावर तर कधी चौथ्या स्थानावर असायची. गेल्या आठवड्यातील टीआरपीच्या यादीतही ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिका चौथ्या स्थानावर होती. पण असं असलं तरीही ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेची जागा ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ नवी मालिका घेणार आहे. अभिनेत्री शिवानी सुर्वे व अभिनेता समीर परांजपे यांची प्रमुख भूमिका असलेली ही नवी मालिका १७ जूनपासून रात्री ९ वाजता पाहायला मिळणार आहे. अशातच ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतील अवनी जोशीने अरिजित सिंहचं ‘मैनू विदा करो…’ गाणं गात प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. अवनीनं शेअर केलेल्या व्हिडीओत, ती एकबाजूला गाणं गात असून दुसऱ्याबाजूला मालिकेतील कलाकारांबरोबरच्या आठवणी पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत तिनं लिहिलं आहे, “आम्हा सगळ्यांकडून तुम्हा सर्वांना खूप धन्यवाद! असंच प्रेम करत राहा.”
अवनीच्या या व्हिडीओवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “तू खूप छान काम केलंस. असंच पुढे छान काम करत राहा आणि आमचं मनोरंजन करत राहा”, “पिहू कायमच लक्षात राहशील. खूप खूप प्रेम. तुझं गाणं ऐकून रडायलाच आलं गं”, “किती गोड गं अवनी”, अशा प्रतिक्रिया चाहत्यांच्या उमटल्या आहेत.