‘झी मराठी’ वाहिनीवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे ‘तुझ्यात जीव रंगला’. अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर चार वर्षांहून अधिक काळ अधिराज्य गाजवलं. राणादा, अंजली, सनीदा, गोदाक्का, आबा, नंदिता, चंदा या पात्रांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. त्यामुळे अजूनही ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत झळकलेले कलाकार त्या पात्रांनी ओळखले जातात.
गेल्या वर्षी ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अंजली म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधरने व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यानंतर आता याच मालिकेत झळकलेला अभिनेता लवकरच व्यवसाय क्षेत्रात पदार्पण करत आहे. याबाबत त्याने स्वतः सोशल मीडियाद्वारे जाहीर केलं आहे.
‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत बरकत म्हणून पाहायला मिळालेला अभिनेता अमोल नाईक आता व्यवसाय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. अमोल कोणता व्यवसाय सुरू करणार आहे, याबाबत त्याने एका व्हिडीओच्या माध्यमातून माहिती दिली आहे.
“नवीन स्टार्ट-अप लवकरच येत आहे. गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ”, असं कॅप्शन लिहित अमोल नाईकने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता म्हणाला की, नमस्कार मी अमोल नाईक. आज तुमच्यासमोर येण्याचं खास कारण आहे. मी आणि माझी टीम एका नवीन व्यवसायात पदार्पण करतोय. तो व्यवसाय म्हणजे महिलांसाठी आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे आपले केस. हे आपले केस अधिक सुंदर कसे बनवता येतील? याकरिता आम्ही तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येत आहे आणि ते काय असणार आहे? हे तुम्हाला लवकरच कळेल.
दरम्यान, गेल्या वर्षी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर अमोल नाईकने आलिशान गाडी खरेदी केली होती. टाटा मोटोर्सची गाडी त्याने घेतली होती. त्यानंतर आता तो अभिनयाबरोबर व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवण्यास सज्ज झाला आहे.
हेही वाचा – “कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळून…”, विशाखा सुभेदारची पतीसाठी खास पोस्ट; म्हणाली, “तू दाही दिशांना…”
अमोलच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ‘तुझ्यात जीव रंगला’नंतर ‘झी मराठी’च्या ‘दार उघडं बये’ मालिकेत काम केलं होतं. या मालिकेत त्याने सुन्याची भूमिका साकारली होती. याशिवाय अमोल ‘सन मराठी’च्या ‘सुंदरी’ मालिकेत झळकला होता. या मालिकेत अमोल विजूच्या भूमिकेत पाहायला मिळाला होता. तसंच ‘संत गजानन शेगावीचे’ मालिकेत देखील अमोलने काम केलं होतं. त्यानंतर तो ‘स्टार प्लस’वरील ‘माटी से बंधी डोर’ या हिंदी मालिकेत झळकला. सध्या अमोल ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे.