‘अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडी आहे. गेल्यावर्षी २ डिसेंबरला हार्दिक-अक्षयाचा विवाहसोहळा पुण्यात थाटात संपन्न झाला. सध्या हार्दिकच्या घरी अक्षयाच्या मंगळागौरीची तयारी सुरु आहे. सोमवारी अभिनेत्रीने मंगळागौरीच्या मेहंदी सोहळ्याची झलक सोशल मीडियावर शेअर केली होती. हार्दिक आणि बाप्पाचं नातं खूप खास आहे. तसेच हार्दिक आणि अक्षयाचा यंदाचा गणेशोत्सव लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव असल्यामुळे खास आहे.
हेही वाचा- ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री गेली १० वर्ष मोदक बनवण्याचा करतेय प्रयत्न; म्हणाली……
हार्दिकने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. हार्दिकने घरच्या गणपतीचा फोटो पोस्टमध्ये शेअर केला आहे. फोटो शेअर करत हार्दिकने लिहिलं आहे “जोश्यांचा राजा २०२३” बायकोचा पहिला गणपती” हार्दिकच्या पोस्टखाली चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.
काही दिवासांपूर्वी अक्षराची मंगळागौरही थाटात पार पडली होती. या मंगळागौरीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हार्दिक-अक्षयाने “मंगळागौर पूजन” असे कॅप्शन देत या सोहळ्यादरम्यानचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. अक्षयाने या सोहळ्यासाठी खास सोनेरी रंगाची साडी नेसली होती. हार्दिकच्या नावाची मेहंदी, सोनेरी रंगाची साडी, हातात बांगड्या असा संपूर्ण शृंगार अभिनेत्रीने केला होता. हार्दिकने बायकोच्या साडीच्या रंगाला मॅचिंग असा सदरा परिधान केला होता.
दरम्यान, ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे हार्दिक-अक्षया प्रसिद्धीझोतात आले होते. या मालिकेत हार्दिकने राणादा, तर अक्षयाने अंजली पाठक ही भूमिका साकारली होती. राणादा आणि पाठकबाईंच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. मालिका संपल्यावर काही महिन्यातच दोघांनीही गुपचूप साखरपुडा उरकत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.हार्दिक हा लवकरच ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात झळकणार आहे.