अभिनेत्री, नृत्यांगना व मॉडेल म्हणून माधुरी पवार (Madhuri Pawar) ओळखली जाते. अभिनेत्रीने अप्सरा आली या रिअॅलिटी शोचे विजेतेपद मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मालिकांमधील तिच्या भूमिकांना विशेष पसंती मिळाल्याचे पाहायला मिळाले. ‘फुल मॅरेज, हाफ मॅरेज, नो मॅरेज’, ‘तुझ्यात जीव रंगला’, ‘रान बाजार’, ‘देवमाणूस’ या मालिकांत माधुरी पवार महत्त्वाच्या भूमिकेत दिसली आहे. त्याबरोबरच इर्साल, एक नंबर, अल्याड पल्याड, लंडन मिसळ अशा चित्रपटांतून अभिनेत्रीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता एका मुलाखतीत अभिनेत्रीने, माधुरी पवारने साताऱ्याची वैशिष्ट्ये काय आहेत ते सांगून, खासदार उदयनराजे भोसले यांचेही कौतुक केले आहे.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

अभिनेत्री माधुरी पवारने नुकतीच ‘आरपार’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला विचारले की, साताऱ्याची काय काय वैशिष्ट्य आहेत? त्यावर बोलताना माधुरीने म्हटले, “साताऱ्याला एक इतिहास आहे आणि महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. त्यामुळे मी त्या भूमीत जन्म घेतलाय याचा सार्थ अभिमान, गर्व आहे. त्या भूमीमध्ये जे पिकतंय, ते आता तुम्हाला दिसतंय. व्यक्तीच्या वेगवेगळ्या छटा तुम्हाला दिसतायत. ती व्यक्ती जेवढी प्रेमळ आहे तेवढीच ती क्रोधीसुद्धा आहे. जे चांगलं आहे, ते चांगलंच आहे, जे वाईट आहे, ते चुकीचं आहे.

पुष्पा चित्रपटातील डायलॉग…

“साताऱ्याचे महाराज आता छत्रपती उदयनराजे तुम्हाला माहितीच आहेत. खरं तर आता जो पुष्पा चित्रपटातील डायलॉग आहे ना, झुकेगा नहीं साला हा त्यांच्यासाठीच आहे. कारण- मी लहानपणापासून पाहिलंय ना, महाराज कोणापुढे कधीही झुकले नाहीत. अजूनही झुकत नाहीत. तो राजा माणूस आहे. कधी आतापर्यंत समोरासमोर अशी भेट झाली नाहीये. पण, त्यांनी माझ्यासाठी चांगल्या गोष्टी बोलल्या, केलेल्या आहेत. त्यांनी काही वेळा म्हटलं आहे की, साताऱ्याची पोरगी आहे, तू जिंकून यायचं. लढ तू बिनधास्त. हे जे आहे ना, ते साताऱ्यामधील माणसांमध्ये असतंच. सातारा म्हटलं की, फार जवळ वाटतं.”

माधुरी पवारने या मुलाखतीत तिचे काही अनुभव सांगत लोक तिला मर्दानी म्हणत कौतुक करतात, असेही म्हटले. माधुरीने म्हटले, “खूप लोक मर्दानी म्हणतात. खूप असे अनोळखी लोक आहेत. त्यांनी मला कधी पाहिलंही नव्हतं. पण, त्यांना माझ्या या स्वभावामुळे म्हणा, जशी मी आहे. त्यामुळे त्यांना असं वाटतं की, अशी आमची बहीण असावी. अशी काही नाती आहेत, ज्यांनी न बघता मला बहीण मानलं. जसं की अप्सरा आली, मी करत होते. त्यात खूप सारे प्रसंग होते. आपण जे असतो, ते पुढच्या माणसाला दिसतं आणि एक बॉण्ड तयार होतो. असे खूप जण आहेत, ज्यांनी मला मनापासून बहीण मानलं. त्यानंतर ५-५ वर्षं वाट बघून ती माणसं मला भेटली आहेत. माझा फोटो असलेले मोबाईलचे कव्हर दाखवले आहे. ते बघितल्यावर इतकं भारी वाटतं ना, की काय पाहिजे आणखी आपल्या आयुष्यात, असं वाटतं. आपण हे कमवलं पाहिजे आणि ते कमवलं. आता माझ्यावर जबाबदारी आहे की, ते तसंच ठेवायचं”, असे म्हणत चाहत्यांकडून मिळणाऱ्या प्रेमाबद्दलची माहिती तिने दिली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tujhyat jeev rangala fame madhuri pawar praised udayanraje bhosale says dialogue in the movie pushpa is for him also shares characters of satara nsp