मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक म्हणजे अभिनेत्री श्रुती मराठे व अभिनेता गौरव घाटणेकर. दोघं अभिनयाबरोबर निर्मिती क्षेत्रातही काम करत आहेत. ‘ब्लॅक कॉफी प्रॉडक्शन्स’ असं त्यांच्या निर्मिती संस्थेचं नाव आहे. २०२२मध्ये सुरू झालेल्या ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेद्वारे श्रुती व गौरवने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं. दोघांची पहिली निर्मिती असलेल्या या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता श्रुती व गौरवची निर्मिती असलेली नवी मालिका प्रेक्षकांच्या लवकरच भेटीस येत आहे. याच मालिकेत गौरव ‘तुजवीण सख्या रे’नंतर प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
‘तुजवीण सख्या रे’ मालिकेत गौरव घाटणेकरने साकारलेल्या रिषभने सगळ्यांचं वेड लावलं होतं. तरुणाईमध्ये रिषभ खूप चर्चेत होता. ‘तुजवीण सख्या रे’ मालिकेनंतर गौरव बऱ्याच मालिकांमध्ये छोट-छोट्या भूमिका करताना दिसला. पण आता नव्या मालिकेत प्रमुख भूमिकेत गौरव झळकणार आहे. श्रुती आणि त्याचीच निर्मिती असलेली ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘भूमिकन्या – साद घालते निसर्गराजा’ या नव्या मालिकेत गौरव दिसणार आहे.
हेही वाचा – Video: झटपट कशी बनवायची मँगो कुल्फी? ऐश्वर्या नारकरांनी सांगितली रेसिपी, पाहा व्हिडीओ
१० जूनपासून ‘भूमिकन्या – साद घालते निसर्गराजा’ नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेत गौरव हर्षवर्धनची व्यतिरेखा साकारणार आहे. आता हर्षवर्धनची व्यक्तिरेखा कशी असेल? आणि त्याचा परिवेष कसा असेल? याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे. मालिकेचा विषय फार नवीन आणि वेगळा आहे. आपल्या शेतकरी वडिलांना ही भूमिकन्या कशी साथ देणार, हे या मालिकेतून पाहायला मिळणार आहे. लक्ष्मी असं या भूमिकन्येचं नाव असून अभिनेत्री अनुष्का बोऱ्हाडे ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. अभिनेत्री अनुष्का बोऱ्हाडे हिला प्रेक्षकांनी आजवर विविध व्यक्तिरेखांमधून पाहिले आहे. प्रेक्षकांनी तिच्यावर भरभरून प्रेम देखील केलं आहे. पण आता ‘भूमिकन्या – साद घालते निसर्गराजा’ या मालिकेत भूमिकन्या म्हणजेच लक्ष्मी या व्यक्तिरेखेद्वारे ती प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
आता हर्षवर्धन आणि लक्ष्मी यांची जोडी कशा प्रकारे प्रेक्षकांच्या भेटीस येईल? हे प्रेक्षकांना प्रत्यक्ष मालिकेतूनच पाहायला मिळेल. येत्या १० जूनपासून ‘सोनी मराठी’ वाहिनीवर सोमवार ते शनिवारी रात्री ८ वाजता ‘भूमिकन्या – साद घालते निसर्गराजा’ मालिका प्रसारित होणार आहे. दरम्यान, गौरव घाटणेकर याआधी ‘स्टार प्रवाह’च्या ‘अबोली’ मालिकेत पाहायला मिळाला होता. या मालिकेत त्याने वकिलाची भूमिका साकारली होती.