Zee Marathi New Show : छोट्या पडद्यावर सध्या अनेक कलाकार पुनरागमन करत असल्याचं पाहायला मिळत आहे. अक्षया देवधर, राकेश बापट यांच्या पाठोपाठ आता ‘झी मराठी’ वाहिनीवर आणखी एक अभिनेत्री कमबॅक करणार आहे. येत्या काही दिवसांत वाहिनीवर ‘चल भावा सिटीत’ हा नवीन शो चालू होणार आहे. या शोचं कथानक ग्रामीण आणि शहरी भागातील जीवनशैली यावर आधारित असणार आहे. मराठीसह बॉलीवूड कलाविश्व गाजवणारा स्टार अभिनेता श्रेयस तळपदे या शोमधून टेलिव्हिजनवर कमबॅक करतोय. तर, ‘तुला पाहते रे’ फेम अभिनेत्री या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहे. याबद्दल जाणून घेऊयात…

‘तुला पाहते रे’ ही मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर २०१८ मध्ये प्रसारित व्हायची. सुबोध भावे आणि गायत्री दातार यांच्या या मालिकेत प्रमुख भूमिका होत्या. वर्षभर या मालिकेला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं. ईशा निमकरची भूमिका साकारणारी गायत्री घराघरांत लोकप्रिय झाली होती. ही मालिका संपल्यावर गायत्री ‘डान्सिंग क्वीन’ आणि अलीकडेच ‘अबीर गुलाल’ या मालिकेत झळकली. पण, आता गायत्री पुन्हा एकदा ‘झी मराठी’वर पुनरागमन करण्यास सज्ज झाली आहे.

“Drama करण्यात माहीर असलेली सिटी सुंदरी गायत्री येतेय तुमच्या भेटीला!” असं कॅप्शन देत ‘झी मराठी’ने गायत्रीच्या एन्ट्रीची अधिकृत घोषणा केलेली आहे. तिच्यासह या शोमध्ये आणखी एक लोकप्रिय चेहरा स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहे. तिचं नाव आहे अनुश्री माने. सोशल मीडियावर ट्रेडिंग झालेल्या “नखरेवाली…” या गाण्यात अनुश्री झळकली होती. या दोघींसह जोआना अश्का, भाग्यश्री मुरकर, अक्षता उकिरडे या अभिनेत्री देखील या शोमध्ये एन्ट्री घेणार आहेत.

‘चल भावा सिटीत’ हा शो येत्या १५ मार्चपासून दररोज रात्री ९:३० वाजता प्रक्षेपित केला जाणार आहे. हा कार्यक्रम प्रेक्षकांना ग्रामीण महाराष्ट्राची समृद्धी आणि संस्कृती यांचं दर्शन घडवेल. सिटीत गाव गाजणार म्हणजे नक्की काय होणार हे प्रेक्षकांसमोर हळुहळू उलगडत जाईल.

दरम्यान, या शोच्या होस्टिंगची जबाबदारी अभिनेता श्रेयस तळपदे सांभाळणार आहे. या शोच्या निमित्ताने तब्बल दोन वर्षांनी श्रेयस टेलिव्हिजनवर कमबॅक करणार आहे. यापूर्वी त्याने ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत काम केलं होतं.

Story img Loader