काही मालिकांना प्रेक्षकांचे इतके प्रेम मिळते की, या मालिका संपल्यानंतरही त्याविषयी प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा असते. अशा मालिकांपैकी एक म्हणजेच ‘तुला पाहते रे'(Tula Pahate Re) ही मालिका आहे. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेली ही मालिका जवळजवळ एक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत होती. २०१९ ला या मालिकेने प्रेक्षकांचा जरी निरोप घेतला असला तरी या मालिकेची लोकप्रियता आजही तशीच आहे. आता पुन्हा एकदा तुला पाहते रे ही मालिका मोठ्या चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे या मालिकेचा रिमेक होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या मालिकेची गोष्ट पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मालिकेचा हिंदी भाषेत रिमेक होणार

‘तुला पाहते रे’ ही मालिका झी मराठी या वाहिनीवर प्रदर्शित होत होती. आता मराठी ‘टेली स्पाय’नुसार या मालिकेचा हिंदी भाषेत रिमेक होणार आहे. ‘तुम से तुम तक’ असे या मालिकेचे नाव असणार आहे. झी टीव्हीवर ही मालिका प्रदर्शित होणार आहे. विशेष बाब म्हणजे ही मालिका फक्त हिंदी भाषेतच नाही, तर बंगाली भाषेतसुद्धा पाहता येणार आहे. कारण- बंगाली भाषेतही ‘तुला पाहते रे’ मालिकेचा रिमेक होणार असून, चिरोदिनी तुमी जे आमार असे त्याचे नाव असणार आहे. झी बांग्ला या चॅनेलवर ही मालिका पाहता येणार आहे.

सुबोध भावे व गायत्री दातार यांनी तुला पाहते रे या मालिकेत प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. सुबोध भावे यांनी विक्रांत ही भूमिका साकारली होती; तर गायत्री दातार ईशा या भूमिकेत दिसली होती. दोघांच्या वयातील अंतर, घरच्या परिस्थितीत असणारा फरक असूनही ईशा व विक्रांत एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांच्या लव्हस्टोरीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. कथानकाबरोबरच मालिकेच्या शीर्षकगीतालाही प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली. त्यामुळे या मालिकेचा दुसरा भाग कधी भेटीला येणार, याबद्दलही चाहते अनेकदा प्रश्न विचारताना दिसतात. सुबोध भावे व गायत्री दातार यांच्याबरोबरच गार्गी फुले, अभिज्ञा भावे, आशुतोष गोखले, सोनल पवार, उमेश जगताप, शिल्पा तुळसकर हे आणि इतर काही कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसले होते.

दरम्यान, सुबोध भावेंच्या कामाबद्दल बोलायचे, तर अभिनेते विविध धाटणीच्या भूमिका साकारताना दिसतात. चित्रपट असो वा मालिका ते त्यांच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. नुकतेच ते ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत दिसले होते. त्यामध्ये अभिनेत्री शिवानी सोनार प्रमुख भूमिकेत दिसली होती. त्याबरोबरच हॅशटॅग तदेव लग्नम या चित्रपटातून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या चित्रपटात अभिनेत्री तेजश्री प्रधान प्रमुख भूमिकेत दिसली होती. सुबोध भावेंची प्रमुख भूमिका असलेला बहुप्रतीक्षित संगीत मानापमान हा चित्रपट १० जानेवारीला प्रदर्शित झाला. तर, गायत्री दातार नुकतीच अबीर गुलाल या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसली होती. या मालिकेत तिने साकारलेली नकारात्मक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. आता हे कलाकार कोणत्या नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.