Tula Shikvin Changalach Dhada New Actor Entry : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अक्षरा-अधिपतीमध्ये दुरावा आल्याचा सीक्वेन्स चालू आहे. मास्तरीण बाई घर सोडून निघून गेल्यापासून भुवनेश्वरी सुनेबद्दल सर्वांच्या मनात विष कालवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, चारुहासने दिलेल्या सल्ल्याप्रमाणे अधिपती मकरसंक्रांतीच्या दिवशी अक्षराला भेटण्याचा निर्णय घेतो.
अधिपती अक्षराला भेटण्यासाठी तिच्या माहेरी जातो. तर, अक्षरा आपल्या नवऱ्याला भेटण्यासाठी पुन्हा सूर्यवंशींच्या घरी जाते. याठिकाणी भुवनेश्वरीशी तिचा मोठा वाद होतो. तर, दुसरीकडे अक्षराची बहीण इरा अधिपतीचे कान भरते. यामुळे दोघांमध्ये गैरसमज निर्माण होणार आहे. इरा, “अक्षराचा मित्र परदेशातून आला आहे आणि ताई त्यालाच भेटायला गेली आहे” असं अधिपतीला सांगते. हे ऐकताच अधिपती काहीसा अस्वस्थ होतो.
अक्षराचा मित्र म्हणून मालिकेत कोण येणार याची उत्सुकता गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली होती. अखेर नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोतून मालिकेत लवकरच तेजस बर्वे एन्ट्री घेणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. तेजसने यापूर्वी ‘झी मराठी’ची मालिका ‘मिसेस मुख्यमंत्री’मध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा अनेक वर्षांनी ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मधून छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी तेजस सज्ज झाला आहे.
तेजस मालिकेत अक्षराच्या मित्राच्या भूमिका साकारणार आहे. तो तिला ‘अक्ष…’ अशी हाक मारत असतो. तो अक्षराला फोन करतो, दोघांची भेट होते पण, मास्तरीण बाई गरोदर असल्याने तिला चक्कर येते इतक्यात तेजस तिला सावरतो. अक्षराने आपण लगेच घरी जाऊयात असंही मित्राला सांगितलेलं असतं. नेमकी हिच गोष्ट अधिपती पाहतो आणि बायकोबद्दल त्याच्या मनात संशय निर्माण होतो. अक्षरा आपली फसवणूक करतेय या विचाराने अधिपतीचे डोळे पाणवतात.
तेसजच्या एन्ट्रीने अक्षरा अधिपतीच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ संशयाची ठिणगी पडणार आहे. त्यामुळे आता ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका कोणतं नवीन वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ही मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर रात्री १०.३० वाजता प्रसारित केली जाते.