Tula Shikvin Changalach Dhada Fame Hrishikesh Shelar : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका १३ मार्च २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली. जवळपास दोन वर्षे ही मालिका सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना पहिल्यांदाच शिवानी रांगोळे आणि हृषिकेश शेलारची फ्रेश जोडी एकत्र काम करताना पाहायला मिळाली. या दोघांनी मालिकेत अक्षरा-अधिपतीच्या भूमिका साकारल्या आहेत. प्रत्येक आईसाठी ‘आयडॉल मुलगा’ जसा असतो अगदी तसंच हे अधिपतीचं पात्र आहे. आई भुवनेश्वरीच्या पुढे कोणीही नाही, तिच्या शब्दाबाहेर काहीच नाही अन् तिच्याशिवाय दुसऱ्या कोणाचं ऐकायचं नाही या तत्त्वावर चालणारा अधिपती, कसा साकारायला मिळाला? ही मालिका कशी मिळाली याबद्दल हृषिकेश शेलारने नुकत्याच ‘मित्र म्हणे’ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.

हृषिकेशने ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’च्या आधी ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेमध्ये नकारात्मक भूमिका साकारली होती. याशिवाय अभिनेत्याने काही नाटकांमध्ये देखील काम केलेलं आहे. अधिपती ही मालिकेतली लीड भूमिका कशी मिळाली याबद्दल सांगताना हृषिकेश म्हणतो, “लॉकडाऊन संपताना मला ‘कलर्स मराठी’च्या ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेसाठी फोन आला होता. त्याआधी मी त्या चॅनेलसाठी ‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ मालिकेत काम केलेलं होतं. त्यामुळे माझं नाव आणि काम बऱ्यापैकी सर्वांना माहिती होतं, मग मला थेट ‘दौलत’ ही नकारात्मक भूमिका ऑफर करण्यात आली होती.

हेही वाचा : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मधील अशिक्षित अधिपतीचं खऱ्या आयुष्यात किती शिक्षण झालंय माहितेय का?

“‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका मधुगंधा कुलकर्णी लिहायच्या, त्यामुळे त्यांना माझं काम माहिती होतं. दौलत हा हार्डकोअर व्हिलन होता, त्यामुळे हा व्हिलन साकारणार मुलगा, या अधिपतीच्या भूमिकेसाठी फिट होऊ शकतो हे त्यांना का वाटलं असेल माहिती नाही. पण, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला.”

“लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांनीच माझं नाव अधिपतीच्या भूमिकेसाठी सुचवलं होतं. अधिपतीची भूमिका लोकांना खूप आवडली. मुळात नकारात्मक भूमिकेपासून ते सकारात्मक भूमिकेपर्यंत अशा वेगळ्या शेड लोकांनी पाहिल्या, त्यामुळे सर्वात जास्त माझ्या अभिनयाचं कौतुक केलं गेलं. मी सांगलीचा आहे पण, मालिकेमुळे आता लोकांना मी कोल्हापूरचा वाटतोय. मला मालिकेत अधिपतीच्या भूमिकेत पाहिल्यावर आता मी हिरोच्या भूमिका सुद्धा करू शकतो यावर लोकांचा विश्वास बसलाय.” असं हृषिकेशने सांगितलं.

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीचं पार पडलं डोहाळेजेवण, अस्मिता खऱ्या आयुष्यात आई होणार, समोर आला पहिला फोटो

दरम्यान, सध्या हृषिकेश शेलार ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेबरोबरच प्रशांत दामले यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘शिकायला गेलो एक’ या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.

Story img Loader