Tula Shikvin Changalach Dhada : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अक्षरा आणि अधिपती यांच्यात दुरावा आल्याचा सीक्वेन्स चालू आहे. दोघंही मकरसंक्रांतीच्या शुभमुहूर्तावर एकमेकांना भेटण्याचा निर्णय घेतात. पण, ऐनवेळी भुवनेश्वरी अक्षराची बहीण इराला हाताशी घेऊन या दोघांमध्ये गैरसमज निर्माण करणार आहे.

अधिपती अक्षराला भेटण्यासाठी तिच्या माहेरी जातो. तर, मास्तरीण बाई आपल्या वडिलांसह सासरी येते. नेमकी याचवेळी दोघांची चुकामूक होते. अधिपती घरी नसल्याने अक्षरा आणि तिच्या वडिलांना सूर्यवंशींच्या घरी अपमान सहन करावा लागतो. पण, अक्षरा यावेळी सासूचा एकही शब्द ऐकून न घेता तिला प्रतिउत्तर देते. अक्षरा आणि भुवनेश्वरी यांच्यात या दरम्यान मोठा वाद होतो. तर, दुसरीकडे इरा आपल्या स्वत:च्याच बहिणीविरोधात अधिपतीचे कान भरते.

‘ताईचा मित्र परदेशातून आल्यापासून ती खूप आनंदी आहे’ असा निरोप ती अधिपतीला देते. आता या विदेशातून आलेल्या अक्षराच्या ‘मॅड’ मित्राची भूमिका मालिकेत तेजस बर्वे साकारणार आहे. यापूर्वी त्याने ‘झी मराठी’च्या ‘मिसेस मुख्यमंत्री’ मालिकेत काम केलेलं आहे.

अक्षरा व तिच्या मित्राची एका गार्डनमध्ये भेट झाल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे. तेजस बर्वे अक्षराला संसाराबद्दलचे अनेक प्रश्न विचारत असल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय. पण, अक्षरा धावपळीमुळे आधीच थकलेली असते. तिला मित्राशी संवाद साधताना चक्कर येते. यावेळी हा मित्र मास्तरीण बाईंना आधार देतो. पण, हे सगळं विरुद्ध दिशेला उभा असलेला अधिपती पाहतो आणि त्याच्या मनात वेगळीच शंका निर्माण होते. इराने मनात आधीच विष कालवल्याने अधिपतीच्या मनात आता मोठा गैरसमज निर्माण होणार आहे.

अधिपती घरी जाऊन देखील चिडचिड करतो. अक्षरासाठी तयार केलेलं आरतीचं ताट तो उडवून लावतो. मास्तरीण बाई आता पुन्हा येणार नाहीत असं तो घरच्यांना सांगतो. या गोष्टी पाहून भुवनेश्वरीला आनंद होतो, तर चारुहास मात्र मोठ्या विवंचनेत पडतो. अक्षरा चक्कर आल्याने चेकअप करण्यासाठी डॉक्टरकडे गेली असता तिला डॉक्टर, “पुढच्यावेळी पतीला घेऊन ये” असा सल्ला देतात. यामुळे अक्षरा देखील विचारात पडते.

दरम्यान, आता अक्षरा-अधिपतीमधला गैरसमज दूर केव्हा होणार? दोघंही एकत्र येणार की नाहीत? या गोष्टी ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेच्या आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळतील.

Story img Loader