Tula Shikvin Changalach Dhada Promo : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत सध्या भुवनेश्वरीचं खरं रुप सूर्यवंशी कुटुंबीयांसमोर आणण्यासाठी अक्षरा अनेक प्रयत्न करत असल्याचा सीक्वेन्स चालू आहे. गेल्या काही महिन्यांपासून भुवनेश्वरी अधिपतीची खरी आई चारुलताचं रुप घेऊन सूर्यवंशींच्या घरी राहत होती. मात्र, अक्षराने वेळीच हुशारीने तिचं खरं रुप ओळखलं. यानंतर भुवनेश्वरी आणि चारुहासचं लग्न अक्षराने मोडलं, तसेच येत्या काळात अधिपतीसमोर काही केल्या त्याच्या भुवनेश्वरीचा खोटा चेहरा उघड करायचा असा निश्चय मास्तरीण बाईंनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अक्षरा भुवनेश्वरी विरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी बजरंगला जेलमध्ये जाऊन भेटते. भुवनेश्वरीला फक्त सत्ता हवीये याची कबुली बज्या सुद्धा तिच्यासमोर देतो म्हणून, अक्षरा त्याला सूर्यवंशींकडे नेते. अधिपतीसमोर भुवनेश्वरीच्या चुकीच्या कृत्यांची कबुली दे…असं ती बजरंगला सांगते. मात्र, ऐनवेळी बज्या पलटतो. भुवनेश्वरीबद्दल चुकीचं सांगण्यासाठी अक्षरा दबाव देत असल्याचा दावा बजरंग करतो. यामुळे अक्षराची सर्वांसमोर मोठी कोंडी होते.

हेही वाचा : ‘झी मराठी’ची लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! ‘शेवटचा दिवस’ म्हणत कलाकारांनी शेअर केले सेटवरचे फोटो

अधिपतीने घेतली भुवनेश्वरीची बाजू

बजरंग ऐनवेळी पलटल्यामुळे अक्षरा तोंडावर पडते. हा सगळा प्रकार पाहून अधिपती संतापतो. तर, अक्षराला अश्रू अनावर होतात. मास्तरीण बाई चिडून अधिपतीला विचारते, “तुमच्या मनात माझं, बाबांचं काहीच स्थान नाहीये का?” यावर अधिपती म्हणतो, “माझ्या मनात सगळ्यांचं स्थान आहे पण, आमच्या आईसाहेबांचं स्थान सर्वांत मोठं आणि वरचं आहे.”

दोघांच्या वादात भुवनेश्वरी उडी घेते. ती म्हणते, “सूनबाई आणि या घराला आम्ही इथे नको आहोत. त्यामुळे आम्हाला निघून जाऊदेत.” यावर अधिपती आईचे पाय धरतो आणि तिला घराबाहेर जाण्यापासून अडवतो. तो म्हणतो, “आईसाहेब तुम्ही कुठेही जायचं नाही. तुम्ही आम्हाला हव्या आहात.”

अक्षरा हा सगळा प्रकार पाहून आणखी संतापते ती म्हणते, “या अशा खोटारड्या व्यक्तीबरोबर मी या घरात राहू शकत नाही. ते मला शक्य नाहीये.” यावर अधिपती बायकोला म्हणतो, “तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तुमचा तुम्ही घ्या…” नवऱ्याचं बोलणं ऐकून अक्षरा आणखी दुखावते तर, भुवनेश्वरी मात्र मनातून प्रचंड आनंदी असते. कारण, मास्तरीण बाईंना काही करून सर्वांसमोर खोटं ठरवून घरातून हाकलून लावायंच हे तिचं स्वप्न असतं.

हेही वाचा : नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून

दरम्यान, आता अक्षरा या सगळ्या प्रकारानंतर घर सोडून जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेच्या आगामी भागात काय पाहायला मिळणार, अधिपती अक्षराला अडवणार का?, अक्षराने घर सोडल्यावर चारुहास काय भूमिका घेणार याचा उलगडा लवकरच मालिकेत ( Tula Shikvin Changalach Dhada ) होईल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless watch promo sva 00