Tula Shikvin Changalach Dhada New Promo : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत सध्या अक्षरा-अधिपतीमध्ये भुवनेश्वरीमुळे दुरावा आल्याचा सीक्वेन्स चालू आहे. चारुहासशी लग्न करण्यासाठी भुवनेश्वरीने खोट्या चारुलताचं रुप घेतलं होतं आणि या प्लॅनमध्ये अधिपतीने सुद्धा आपल्या आईची साथ दिली, ही गोष्ट समजल्यापासून अक्षरा-अधिपतीमध्ये सतत वाद होत असतात. याशिवाय भुवनेश्वरी मॅडमसारख्या खोटं बोलणाऱ्या बाईबरोबर मी एका घरात राहू शकत नाही अशी भूमिका अक्षरा घेते त्यामुळे, अधिपती अक्षराला तुम्ही तुमचा निर्णय घ्या असं सांगून घराबाहेर जाण्याचे संकेत देतो.
अक्षरा सुद्धा काहीच वाद न घालता सूर्यवंशींचं घर सोडण्याचा निर्णय घेते. सुनबाईंनी घर सोडलंय हे ऐकताच भुवनेश्वरीचा आनंद गगनात मावेनासा होता. पण, या गोष्टी चारुहासला अजिबात पटलेल्या नसतात. तो अक्षराला अडवण्याचा प्रयत्न करतो पण, ती काही केल्या ऐकत नाही. आता घराबाहेर पडल्यावर अक्षरा गरोदर असल्याची आनंदाची बातमी सर्वांना मिळाली आहे. पण, सुरुवातीचे काही दिवस अक्षराने ही बातमी अधिपतीपासून लपवून ठेवण्याचा निर्णय घेतला होता. “बाळाचा आधार घेऊन मी पुन्हा घरात येऊ पाहतेय” असं अधिपतीला वाटू नये या अनुषंगाने हा निर्णय अक्षराने घेतलेला असतो.
एकीकडे अक्षराकडे गूडन्यूज असते तर, दुसरीकडे सुनबाई व अधिपतीचा घटस्फोट व्हावा यासाठी भुवनेश्वरी प्रयत्न करत असते. अक्षरा पुन्हा घरात आली तर, मोठा अनर्थ होईल आणि भुवनेश्वरीच्या हातून सगळी सत्ता निघून जाईल याची जाणीव तिला असते. यामुळेच अक्षरा व अधिपती यांच्यात दुरावा कसा निर्माण होईल यासाठी भुवनेश्वरी प्रयत्न करताना दिसतेय.
चारुहास मात्र, “काही करुन बायकोला पुन्हा घरी घेऊन ये” अशी विनंती अधिपतीला करतो. आता अधिपती खास बायकोला भेटण्यासाठी तिच्या माहेरी जाणार आहे. तर, अक्षरा अधिपतीला भेटून गुडन्यूज सांगण्यासाठी सूर्यवंशींच्या घरी जाणार आहे. दोघंही एकमेकांकडे गेल्याने यांच्यात एक वेगळाच गैरसमज निर्माण होणार आहे.
अधिपती अक्षराच्या माहेरी जातो तेव्हा त्याठिकाणी तिची बहीण बसलेली असते. अधिपती मनात ठरवून आलेला असतो… मास्तरीण बाई आज तुम्हाला काही करुन घरी घेऊन जाणार…असा विश्वास त्याच्या मनात असतो. मात्र, ऐनवेळी अक्षरा घरी नाहीये हे त्याला समजतं. तो तिच्या बहिणीला विचारतो, “ठीक आहेत ना मास्तरीण बाई?” यावर इरा त्याला सांगते, “ताई सकाळपासून बाहेर गेलीये. तिचा मित्र आलाय ना परदेशातून… मित्र आल्यापासून एकदम खूश आहे.”
तर, सूर्यवंशीच्या घरात पुन्हा एकदा अक्षराला पाहून भुवनेश्वरी संतापते. ती म्हणते, “थांबा आल्यापावली परत जा… घर सोडलं ना मग नातं कशाला धरुन ठेवलंय, द्या नात्याला अग्नी”
अक्षरा यावेळी जराही ऐकून न घेता सासूला थेट उलट उत्तर देते. “तुम्ही दिलात का तुमच्या नात्याला अग्नी, तुमचं तर लग्नही झालेलं नाही, तरी तुम्ही हे घर आजही सोडलेलं नाहीये आणि नातंही तोडलेलं नाही. माझं म्हणाल तर, देवा ब्राम्हणाच्या साक्षीने आमचं लग्न झालंय. त्यामुळे हे घर माझं आहे.” असं ठाम उत्तर अक्षरा भुवनेश्वरीला देते. पण, या अधिपती आणि अक्षराची एकमेकांशी भेट न झाल्यामुळे आणि इराने जीजूच्या मनात विष कालवल्याने या जोडप्यामध्ये नवीन गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे.