Tula Shikvin Changalach Dhada New Promo : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत सध्या अक्षरा, सूर्यवंशी कुटुंबाचं घर सोडून निघून गेल्याचा सीक्वेन्स चालू आहे. भुवनेश्वरीच्या कारस्थानांना कंटाळून अक्षरा अधिपतीकडे न्यायाची मागणी करते. मात्र, अधिपती आपल्या आईच्या विरोधात जायला अजिबातच तयार नसतो. त्यामुळे दोघांमध्ये प्रचंड वाद होतात.
अक्षराला घराबाहेर काढायचं हा भुवनेश्वरीचा आधीपासूनच डाव असतो. फक्त ती योग्य संधीची वाट पाहत असते. ऐनवेळी बजरंग, अक्षरा विरोधात बोलल्यामुळे भुवनेश्वरी याच संधीचा फायदा करून घेते. अक्षरा-अधिपतीमध्ये भरल्या घरात भांडणं होतात. इतक्यात चिडलेला अधिपती “तुम्ही तुमचा निर्णय घ्या” असं बायकोला सांगतो. नवऱ्याचं हे मत ऐकून अक्षरा प्रचंड नाराज होते आणि घर सोडण्याचा निर्णय घेते.
भुवनेश्वरीला समजणार अक्षरा गरोदर असल्याचं सत्य
चारुहास सुनेला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण, अक्षरा आपल्या मतावर ठाम असते. याउलट अधिपती तिला अडवण्याचा प्रयत्न करत नाही. अक्षराला घराबाहेर काढल्यावर भुवनेश्वरी आणि तिची बहीण दुर्गेश्वरी या दोघींचा आनंद गगनात मावेनासा होतो. मात्र, अक्षरा घर सोडून गेल्यावर मालिकेत एक नवीन ट्विस्ट येणार आहे. तो म्हणजे मास्तरीण बाई आता आई होणार आहेत.
अक्षरा आपल्या पुढील आयुष्यासाठी देवाची प्रार्थना करत असताना भुवनेश्वरी येते आणि तिला म्हणते, “काय जीव देताय का?, पाण्याकडे असं टकामका का बघताय… द्या जीव” यावर, अक्षरा सासूला म्हणते, “खरंतर पाणी आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतं. तुम्ही सुद्धा पाण्यात पाहिलं पाहिजे. पण, तुम्हाला नाही कळणार कारण, हे सगळं समजून घेण्यासाठी माणसाला शिक्षणाची सुद्धा गरज असते.”
भुवनेश्वरी अक्षरावर दमदाटी करत असतानाच दुर्गेश्वरी डॉक्टरांचे रिपोर्ट्स घेऊन येते आणि आपल्या ताईला म्हणते, “अगं ताई थांब. अधिपतीचं मूल अक्षराच्या पोटात वाढतंय, ताई ती गरोदर आहे.” हे ऐकताच आणि अक्षराचे रिपोर्ट्स पाहून भुवनेश्वरीला मोठा धक्का बसतो. एकीकडे अक्षरा बाळाच्या सुखशांतीसाठी प्रार्थना करत असते. तर, दुसरीकडे भुवनेश्वरी म्हणते, “आता आम्हाला यांची कायमची शांती करावी लागेल.”
मालिकेत ( Tula Shikvin Changalach Dhada ) हा मोठा ट्विस्ट २३ डिसेंबरपासून येणार आहे. हा नवा अध्याय एका नव्या वेळेत पाहायला मिळणार आहे. म्हणजेच आता सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता ही मालिका प्रसारित केली जाणार आहे.