Tula Shikvin Changalach Dhada Marathi Serial : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत सध्या भुवनेश्वरीचं सत्य सूर्यवंशी कुटुंबीयांसमोर उघड झाल्याचा सीक्वेन्स चालू आहे. गेल्या काही दिवसांपासून भुवनेश्वरी चारुलताच्या रुपात सूर्यवंशी कुटुंबात राहत असते आणि अक्षराला वेडं ठरवण्याचा प्रयत्न करते. पण, ऐनवेळी अक्षरा तिची चोरी पकडते आणि भुवनेश्वरी-चारुहासच्या लग्नाचा डाव उधळून लावते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अक्षरावर सुरुवातीला कोणीही विश्वास ठेवण्यास तयार नसतं. पण, हळुहळू मास्तरीण बाई बजरंग विरोधात मोठा पुरावा गोळा करते. त्याच्याकडून हुशारीने सत्य वदवून घेत, अक्षरा हे रेकॉर्डिंग भर लग्नात लावते. यामुळे चारुहास भुवनेश्वरीवर भयंकर संतापतो आणि लग्न मोडतो. अधिपती मात्र, नेहमीप्रमाणे आईची बाजू घेत या सगळ्या प्लॅनची आधीच कल्पना असल्याचं मान्य करतो. यामुळे अक्षराला मोठा धक्का बसतो. अधिपतीने विश्वासघात केल्याची भावना तिच्या मनात निर्माण होते. पण, या सगळ्यातून हार न मानता भुवनेश्वरीचा खोटा चेहरा सर्वांसमोर उघड करायचा असं अक्षरा ठरवते. ती बजरंगला भेटण्यासाठी जेलमध्ये जाते.

हेही वाचा : लग्नानंतर होईलच प्रेम : ‘या’ तामिळ मालिकेचा रिमेक, मृणालचं कमबॅक अन्…; पाहा जबरदस्त नवीन प्रोमो

बजरंगची भेट घेतल्यावर तो अक्षराला म्हणतो, “पोलीस स्टेशन आणि मोठ्या माणसांच्या घराची पायरी अजिबात चढायची नाही. ज्याच्या हातात पैसा ना मॅडम तो माणूस केव्हाही काहीही करू शकतो आणि त्यांनी करून दाखवलं. तुमच्या नवऱ्याने, त्याच्या आईसाहेबांनी मला जेलमध्ये टाकलं.” पुढे, अक्षरा बज्याला म्हणते, “हे बघ तू खरं सांगितलंस तर गोष्टी बदलू शकतात. मी आता अधिपतीला बोलावते त्यांच्यासमोर तू सगळ्या गोष्टी कबूल कर.”

बजरंग याबद्दल पुढे म्हणतो, “नाही-नाही अधिपतीला इथे अजिबात नका बोलावू. ते जर इथे आले हे भुवनेश्वरी मॅडमला समजलं ना…तर, माझं काही खरं नाही. भुवनेश्वरी मॅडमचे हेर सगळीकडे आहेत. ती बाई खूप डेंजर आहे” अक्षरा यानंतर बजरंगला थेट सूर्यवंशींच्या घरी घेऊन जाते. त्याला संपूर्ण कुटुंबासमोर उभं करते आणि चूक मान्य करायला लावते.

हेही वाचा : “प्लीज, तुमचे पैसा वाया घालवू नका”, कोकण हार्टेड गर्लचे ‘पुष्पा 2’ बद्दल स्पष्ट मत; म्हणाली, “जे चित्रपट…”

अक्षरा सर्वांसमोर म्हणते, “बजरंग जे काही सत्य आहे ते सांग… भुवनेश्वरी मॅडम तुम्ही जे म्हणता ना? अधिपतींवर प्रेम आहे, या घरावर प्रेम आहे पण, असं काहीही नाहीये. तुमचं बाबांवरही प्रेम नाहीये. तुम्हाला फक्त सत्ता हवीये, ताकद हवीये. तुम्हाला या घरावर राज्य करायचंय. तुमचा प्लॅन फसला मॅडम, बजरंग सर्वांसमोर सत्य सांग”

नेटकऱ्यांच्या कमेंट्स ( Tula Shikvin Changalach Dhada Marathi Serial )

आता अक्षराच्या म्हणण्यानुसार खरंच बजरंग सत्य सांगणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण, प्रोमोमध्ये त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून बज्या पुन्हा एकदा पलटणार असा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला आहे. भुवनेश्वरी विरुद्ध अक्षरा या सासू-सुनेच्या वादात अधिपती मात्र कोणाची बाजू घ्यावी यावरून संभ्रमात पडला आहे. “अधिपतीला आता तरी शहाणपण द्या”, “या अधिपतीला केव्हा अक्कल येणार” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी हा प्रोमो पाहून केल्या आहेत. तर, अनेकांनी “खोट्याचाच विजय होतो” असं लिहित खंत व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tula shikvin changalach dhada akshara vs bhuvneshwari adhipati in confusion watch promo sva 00