Zee Marathi Tula Shikvin Changalach Dhada : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत सध्या चारुहास आपल्या सुनेला पुन्हा एकदा घरी परत आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून भुवनेश्वरीमुळे अक्षरा-अधिपतीच्या नात्यात मोठा दुरावा आलेला असतो. दोघेही एकमेकांपासून दुरावलेले असतात यामुळे चारुहास या दोघांचं नातं जपण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

अक्षराने भुवनेश्वरी आणि चारुहासचं लग्न मोडल्यामुळे काही करून मास्तरीण बाईंचा संसार उद्धवस्त करायचा असा निश्चय भुवनेश्वरीने केलेला असतो. पण, आता चारुहासने या सगळ्यातून माघार घेतली आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून घरची सून माहेरी राहतेय याबद्दल चारुहासच्या मनात प्रचंड खंत असते. यामुळेच तो मोठा निर्णय घेतो.

चारुहास हतबल होऊन भुवनेश्वरीला जाऊन भेटतो. तिच्यासमोर हात जोडून तो फक्त एक अट घालतो. चारुहासची हतबतलता पाहून भुवनेश्वरी प्रचंड आनंदी होते. “मी हे लग्न करेन पण, एकाच अटीवर तू अक्षराला या घरात परत आणायचं” असं चारुहास भुवनेश्वरीला सांगतो. तसेच “तू जिंकलीस मी हरलो” असंही चारुहास तिच्यासमोर मान्य करतो.

चारुहासने घेतलेली माघार यातच भुवनेश्वरीचं सगळ्यात मोठं यश असतं. हा सगळा प्रकार चारुहास अक्षराच्या कानावर सुद्धा घालतो. तिला सासरेबुवांनी घेतलेला हा निर्णय अजिबात पटत नाही. तर, दुसरीकडे भुवनेश्वरी अक्षरा परत आल्यावर तिला सासुरवास घडवण्याची तयारी करत असते.

भुवनेश्वरी म्हणते, “त्या अधिपतीला कंट्रोल करत राहणार आणि म्हणूनच या घरच्या कर्त्या पुरुषावर बायकोचा हक्क पाहिजे. चारुहासबरोबर आमचं लग्न झाल्यावर आता आमचे हक्क बरोबरीचे होणार आता अक्षराला कायद्याने आणि हक्काने सासुरवास घडवणार”

भुवनेश्वरीचा हा प्लॅन ऐकून तिची बहीण दुर्गेश्वरी प्रचंड आनंदी होते. तर, अक्षरा चारुहासने घेतलेल्या लग्नाच्या निर्णयामुळे प्रचंड नाराज होते. दरम्यान, आता ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ( Tula Shikvin Changalach Dhada ) मालिकेत येत्या भागात काय पाहायला मिळणार, भुवनेश्वरीचं सत्य अधिपतीसमोर केव्हा येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.