Tula Shikvin Changalach Dhada Promo : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ सध्या अक्षरा आणि अधिपतीमध्ये दुरावा निर्माण झाल्याचा सीक्वेन्स सुरू आहे. सासूबरोबर होणाऱ्या रोजच्या वादाला अक्षरा कंटाळलेली असते. याशिवाय अधिपती सुद्धा नेहमीप्रमाणे आपल्या आईची बाजू घेतो. यामुळेच अक्षरा घर सोडण्याचा निर्णय घेते. सुनेने घर सोडून जाणं हे चारुहासला अजिबातच पटलेलं नसतं. पण, दुसऱ्या बाजूला भुवनेश्वरीसह तिची बहीण दुर्गेश्वरी यामुळे प्रचंड आनंदी असते.
आता काही करून घराबाहेर गेलेल्या अक्षराला पुन्हा घरात येऊ द्यायचं नाही असा निर्णय भुवनेश्वरी घेते. कारण, अक्षरा घरात आल्यावर आपलं जगणं कठीण करणार, आपण सूर्यवंशींच्या घरावर अधिराज्य गाजवू शकणार नाही याची पुरेपूर जाणीव भुवनेश्वरीला असते. त्यामुळे गेल्या काही दिवसांत अधिपती आणि अक्षरामध्ये दुरावा निर्माण करण्यासाठी भुवनेश्वरीने अनेक प्रयत्न केल्याचं पाहायला मिळत आहे.
आता चारुहास आपल्यातले मतभेद विसरून कृपा करून अक्षराला पुन्हा घरी आण असा सल्ला आपल्या लेकाला म्हणजेच अधिपतीला देणार आहे. अधिपती वडिलांचं म्हणणं ऐकणार की नाही हे येत्या काळात स्पष्ट होईल. पण, त्याआधीच भुवनेश्वरी अक्षराच्या माहेरी पोहोचणार आहे. सासूबाईंना अचानक घरी आल्याचं पाहून अक्षराला सुद्धा धक्का बसतो.
सुनेला उद्देशून भुवनेश्वरी म्हणते, “ज्याच्यावर तुमचं लय प्रेम आहे. त्याच तुमच्या नवऱ्याने तुम्हाला घराबाहेर जायला सांगितलं.” यावर अक्षरा म्हणते, “आमच्या नात्यात दुरावा जरी आला असला मॅडम…तरी, अंतर आलेलं नाहीये…मला खात्री आहे अधिपती मला स्वत: घरी जाऊन जातील. लवकरच मी घरी परत येईन”
भुवनेश्वरी यानंतर सुनेला खुलं आव्हान देत म्हणते, “हो पण, अधिपतीने तुम्हाला घरी बोलावलं पाहिजे ना?” यानंतर “आम्ही सुनबाईंच्या घरला आलोय…” असं भुवनेश्वरी अधिपतीला फोन करून सांगते. आता आपली आई अक्षराला घ्यायला तिच्या घरी गेलीये हे समजल्यावर या सगळ्यावर अधिपतीचा कौल काय असणार? अक्षराला तो पुन्हा सासरी बोलावणार का? की, भुवनेश्वरीच्या म्हणण्यानुसार अधिपती अक्षराला टाळणार हे येत्या भागात स्पष्ट होणार आहे.
अक्षराला घरी आणण्यात अधिपतीने टाळाटाळ केल्यास याचा काय परिणाम दोघांच्या नात्यावर होणार? आपली बायको आई होणार हे अधिपतीला केव्हा समजणार? या सीक्वेन्सची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.