Tula Shikvin Changalach Dhada : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत सध्या भुवनेश्वरीला कंटाळून अक्षरा घर सोडण्याचा निर्णय घेणार असल्याचा सीक्वेन्स चालू आहे. आपल्या सासूचं… ना अधिपतीवर, ना चारुहासवर ( सासरे ) कोणावरच प्रेम नसून तिला केवळ सत्ता हवीये ही गोष्ट अक्षराला कळून चुकलेली असती. भुवनेश्वरीचं हे कारस्थान ती सूर्यवंशी कुटुंबासमोर उघड सुद्धा करते. पण, शेवटी बजरंग अक्षराविरोधात बोलतो आणि भुवनेश्वरीची बाजू घेते यामुळे मास्तरीण बाई तोंडावर पडते.
अक्षराच्या सासऱ्यांचा म्हणजेच चारुहासचा तिच्यावर पूर्ण विश्वास असतो. पण, अधिपती आपल्यावर कधीच विश्वास ठेवत नाही, याची खंत अक्षराच्या मनात असते. अक्षरा भुवनेश्वरी विरोधातले अनेक पुरावे अधिपतीसमोर सादर करते पण, तो काही केल्या ऐकत नाही. “माझ्या आईसाहेबांपेक्षा महत्त्वाचं कोणीच नाहीये” असं सांगत अधिपती अक्षराला तुम्हाला हवा तो निर्णय घ्या असं सांगतो.
अक्षरा-अधिपतीमधले वाद दिवसेंदिवस वाढत जात असल्याचं सध्या मालिकेत ( Tula Shikvin Changalach Dhada ) पाहायला मिळतंय. शेवटी कंटाळून अधिपती मास्तरीण बाईंना सांगतो, “आता पुरे झालं, आपण एकमेकांचा जीव घेऊ… आता निर्णय घेतला पाहिजे.” नवऱ्याचे हे शब्द ऐकताच अक्षरा प्रचंड भावुक होऊन घर सोडण्याचा निर्णय घेते. इथेच भुवनेश्वरी जिंकते कारण, ज्याप्रकारे अक्षराने चारुहास आणि तिचं लग्न मोडलेलं असतं, अगदी तोच बदला घेऊन लेकाचा संसार उद्धवस्त करायचा असा डाव भुवनेश्वरीचा असतो.
‘झी मराठी’ने शेअर केलेल्या नव्या प्रोमोमध्ये भुवनेश्वरी अक्षराला म्हणते, “काय सूनबाई आम्हाला घराबाहेर काढण्याचा विडा उचलला होता ना तुम्ही, आता तुमच्यासमोरच रस्त्यावर यायची वेळ आलीये.” इतक्यात हॉलमध्ये अधिपती आणि चारुहास येतात. या दोघांना दूरुन येत असल्याचं पाहताच भुवनेश्वरी लगेच आपली कठोर भाषा बदलून सौम्य भाषेत अक्षराशी संवाद साधते.
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी, अधिपती अक्षराला म्हणाला…
अधिपतीला पाहताच भुवनेश्वरी लगेच शब्द बदलून अक्षरासमोर हात जोडते आणि म्हणते, “सूनबाई ऐका आमचं, हात जोडतो तुमच्यासमोर…तुम्ही असं करू नका.” हा खोटेपणा पाहून अक्षरा प्रचंड संतापते ती म्हणते, “अहो! सरड्याला सुद्धा लाज वाटेल इतक्या पटकन रंग बदलताय तुम्ही…”
अधिपती पुन्हा एकदा आईची बाजू घेत म्हणतो, “बास झालं मास्तरीण बाई आता तुम्ही बिलकूल थांबू नका. एवढं बोलायचं असेल तर, मी तुम्हाला बाहेर सोडतो, निघून जा.” पुढे, अक्षरा भावुक होत घरातून बाहेर पडते. यानंतर दुर्गेश्वरी तिच्या तोंडावर घराचे दरवाजे बंद करून घेते. आता या घटनेमुळे अक्षरा अधिपती कायमचे दुरावणार का? अक्षरा घर सोडून कुठे जाणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेचा अक्षरा घर सोडून जात असल्याचा हा विशेष भाग येत्या १८ आणि १९ डिसेंबरला प्रसारित करण्यात येणार आहे.