Tula Shikvin Changalach Dhada : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत सध्या अक्षराचे सासरेबुवा चारुहास, सुनेला घरी परत आणण्यासाठी सतत प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून मालिकेत अक्षरा घर सोडून गेल्याचा ट्रॅक सुरू आहे. दिवसेंदिवस अधिपती आणि अक्षरामधील दुरावा वाढत जात आहे.

अक्षराने भुवनेश्वरी व चारुहास यांचं लग्न मोडलेलं असतं. हाच राग मनात ठेवून भुवनेश्वरी अक्षराचा संसार उद्धवस्त करण्याचा निर्णय घेते. अक्षरा-अधिपतीला एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी ती अनेक प्रयत्न करते. अक्षराच्या धाकट्या बहिणीला हाताशी घेऊन अधिपतीच्या मनात संशय निर्माण करते. यामुळे दिवसेंदिवस दोघांमधले गैरसमज वाढत जात आहेत. याशिवाय भुवनेश्वरीने अक्षराला शाळेपासून दूर करण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे. तसंच अक्षरा-अधिपती एकमेकांना निवांतपणे भेटू शकणार नाहीत, याचीही पूर्ण व्यवस्था भुवनेश्वरीने केलेली असते.

भुवनेश्वरीची कट-कारस्थानं काही केल्या संपत नाहीयेत आणि या सगळ्या भांडणांदरम्यान अधिपती-अक्षरा एकमेकांना साधे नीट भेटले सुद्धा नाहीयेत. त्यामुळे अक्षरा गरोदर असल्याचं सत्य अधिपतीला माहिती नसतं. आपल्या सुनेला काही करून घरी आणायचं असा निश्चय आता चारूहासने केलेला आहे. यामुळे मास्तरीण बाईंचे सासरेबुवा आता एक मोठा निर्णय घेणार आहेत.

चारुहास हतबल होऊन भुवनेश्वरीला जाऊन भेटतो. तिच्यासमोर हात जोडून तो फक्त एक अट घालतो. चारुहासची हतबतलता पाहून भुवनेश्वरी प्रचंड आनंदी होते. “आयुष्यात मला हेच हवं होतं, तुम्ही कधी मला लग्नाची मागणी घालताय… याची मी वाट पाहत होते” असं भवुनेश्वरी चारुहासला सांगते. चारुहास तिचं सगळं म्हणणं ऐकून घेतो आणि लग्नासाठी होकार देतो. पण, लग्न करण्याआधी तो त्याची एक अट भुवनेश्वरीला सांगतो.

“मी हे सगळं करेन पण, एकाच अटीवर तू अक्षराला या घरात परत आणायचं” असं चारुहास भुवनेश्वरीला सांगतो. तसेच “तू जिंकलीस मी हरलो” असंही चारुहास तिच्यासमोर मान्य करतो. हे सगळं पाहून भुवनेश्वरीला आनंदाश्रू अनावर होतात आता ती अक्षराला घरी आणण्याची परवानगी देईल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेचा हा विशेष भाग १० एप्रिलला संध्याकाळी ६ वाजता प्रसारित केला जाणार आहे. आता अक्षरा सासरी परतणार की नाही हे पाहण्यासाठी सगळेच आतुर झाले आहेत.