संत मुक्ताईंचं प्रेरणादायी चरित्र उलगडणारा दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा भव्य मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या सिनेमात नेमकं कोण झळकणार? याविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर या सिनेमात मुख्य भूमिका साकारणाऱ्या कलाकारांची पहिली झलक आता प्रेक्षकांसमोर आलेली आहे.
येत्या १८ एप्रिलला ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. संत मुक्ताईंनी वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी भावंडांचं आईपण स्वीकारत शिष्यांवर मायेची चादर पांघरली. अशा संत मुक्ताईंचे आणि त्यांच्या कुटुंबाचे प्रेरणादायी चरित्र उलगडून दाखवणारा दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा भव्य मराठी चित्रपट १८ एप्रिलला आपल्या भेटीला येणार आहे. रेश्मा कुंदन थडानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून चित्रपटाची प्रस्तुती ए.ए.फिल्म्स ही वितरण संस्था करीत आहे.
सिनेमात झळकणार ‘हे’ कलाकार
‘झी मराठी’च्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत अक्षराच्या जवळच्या मित्राची म्हणजेच मदनची भूमिका साकारणारा अभिनेता तेजस बर्वे या सिनेमात संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत झळकणार आहे. तर, ‘संत मुक्ताईंची’ भूमिका नेहा नाईकने साकारली आहे. संत निवृत्तीनाथांच्या भूमिकेत ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता अभिनेता अक्षय केळकर तर, संत सोपानकाकांची भूमिका सूरज पारसनीस साकारत आहेत.
याचबरोबर समीर धर्माधिकारी, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, मनोज जोशी, योगेश सोमण, स्मिता शेवाळे, सचिन देशपांडे, अभिजीत श्वेतचंद्र, नुपूर दैठणकर, आदिनाथ कोठारे हे कलाकार सुद्धा या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.
संत मुक्ताईंनी स्त्रियांना अध्यात्माचं क्षेत्र खुलं करून देऊन त्यात स्त्री-कर्तृत्वाचा आदर्श उभा केला.‘मुक्ताई’ने निभावलेल्या माता ,भगिनी, गुरु अशा विविध भूमिकांचे पदर ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटातून उलगडणार आहेत.
दरम्यान, ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा बहुचर्चित सिनेमा येत्या १८ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या संपूर्ण कलाविश्वातून या सिनेमाच्या पहिल्या पोस्टरवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. प्राजक्ता गायकवाड, आशय कुलकर्णी, दीप्ती लेले या कलाकारांनी कमेंट्स करत संपूर्ण टीमला सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.