Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik : मराठी कलाविश्वात सध्या लग्नसराई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. सोनाली-अभिषेक, निखिल राजेशिर्के, रेश्मा शिंदे या कलाकारांपाठोपाठ आता छोट्या पडद्यावरची आणखी एक अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री विरीशा नाईक आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मालिकेतील भुवनेश्वरी, अधिपती, अक्षरा, चंचला, दुर्गेश्वरी हे कलाकार घराघरांत लोकप्रिय आहेत. यामध्ये चंचलाची भूमिका साकारणारी अभिनेत्री विरीशा नाईक लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेत्रीचा मेहंदी सोहळा नुकताच पार पडला. याचे खास फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
हेही वाचा : करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
विरीशाने काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत लग्नबंधनात अडकणार असल्याचं जाहीर केलं होतं. यानंतर तिच्या लग्नपत्रिकेमुळे ती उद्या ( १२ डिसेंबर ) विवाहबंधनात अडकणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. तिच्या घरी आता लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झालेली आहे.
विरीशाचा होणारा पती सुद्धा लोकप्रिय अभिनेता आहे. त्याचं नाव आहे प्रशांत निगडे. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि नाट्य निर्माता म्हणून प्रशांत ओळखला जातो. यापूर्वी त्याने ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘स्वाभिमान’ मालिकेत ‘बबन’ ही भूमिका साकारली होती. सध्या तो ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेत ‘रॉकेट’च्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. आता प्रशांतला त्याच्या खऱ्या आयुष्यातली लक्ष्मी ही विरीशाच्या ( चंचला/चंची ) रुपात मिळाली आहे. या दोघांचा साखरपुडा ऑगस्ट महिन्यात पार पडला होता. आता दोघंही १२ डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत.
हेही वाचा : छोटा पुढारी घन:श्यामने Bigg Boss मधून मिळालेल्या पैशांचं काय केलं? चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाला…
दरम्यान, प्रशांत आणि विरीशा यांनी एका नाटकात मध्यवर्ती भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय सध्या रंगभूमीवर सुरू असलेल्या ‘आय एम पुंगळ्या शारुक्या आगीमहुळ’ नाटकात दोघंही नवरा-बायकोची भूमिका साकारत आहेत. आता हळदी सोहळा पार पडल्यावर ही लोकप्रिय जोडी लग्नबंधनात अडकणार आहे.