Zee Marathi : ‘झी नाट्य गौरव’ पुरस्कार सोहळ्यात दरवर्षी रंगभूमीवर येणाऱ्या आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या विविध नाटकांचा तसेच त्यामध्ये काम करणाऱ्या कलाकारांचा सन्मान केला जातो. यंदा प्रशांत दामले यांची प्रमुख भूमिका असलेलं ‘शिकायला गेलो एक’ हे विनोदी नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या नाटकाचं लेखन-दिग्दर्शन अद्वैत दादरकरने केलेलं आहे.
यंदाच्या ‘झी नाट्य गौरव’ पुरस्कार सोहळ्यात प्रशांत दामले यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘शिकायला गेलो एक’ या नाटकाला ‘सर्वोत्कृष्ट विनोदी नाटक’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. यामध्ये प्रशांत दामले यांच्यासह हृषिकेश शेलार, सुशील इनामदार, चिन्मय माहूरकर, अनघा भगरे, समृद्धी मोहरीर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हे नाटक सध्या रंगभूमीवर हाऊसफुल्ल सुरू आहे.
‘झी नाट्य गौरव’ पुरस्कार सोहळ्यात या नाटकाने सर्वोत्कृष्ट विनोदी नाटकाचा पुरस्कार जिंकून बाजी मारली आहे. याबद्दल प्रशांत दामले आणि हृषिकेश शेलार यांनी स्वत: पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
अभिनेता हृषिकेश शेलार ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेमुळे घराघरांत अधिपती म्हणून ओळखला जातो. मालिकेत काम करून सध्या हृषिकेश रंगभूमीवर सुद्धा प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
हृषिकेशला ‘झी नाट्य गौरव’ पुरस्कार सोहळ्यात ‘सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता’ हा पुरस्कार मिळाला आहे. हृषिकेशसाठी सन्मानाची गोष्ट अशी की, हा पुरस्कार त्याला रंगीभूमीचे बादशहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रशांत दामले यांच्यासह विभागून देण्यात आला आहे. अभिनेत्याने पोस्ट शेअर करत याबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. याशिवाय हा पुरस्कार वंदना गुप्ते व भरत जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.
अधिपती म्हणजेच हृषिकेश शेलारची पोस्ट
व्यावसायिक नाटकासाठी मला मिळालेलं पहिलं-वहिलं बक्षीस…
झी नाट्य गौरव २०२५
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता- (विभागून) प्रशांत दामले, हृषिकेश शेलार.
सर्वोत्कृष्ट विनोदी नाटक- “शिकायला गेलो एक”.अद्वैत दादरकर, प्रशांत दामले, कविता मेढेकर, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, मधुगंधा कुलकर्णी, झी मराठी आणि आमच्या नाटकातील माझे सहकलाकार या सगळ्यांचे आभार! या मंडळींमुळे हे शक्य झालं आणि सगळ्यात महत्वाचं, रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार!
दरम्यान, हृषिकेशच्या पोस्टवर केतकी पालव, स्वप्नील राजशेखर, अद्वैत दादरकर, अनघा भगरे, ओमप्रकाश शिंदे, ऋतुजा बागवे, अश्विनी कासार, शिवानी रांगोळे, संग्राम समेळ, प्रियदर्शन जाधव या सगळ्या कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.