Marathi Actor Swapnil Rajshekhar : छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये नवनवीन कलाकारांच्या एन्ट्री होत असल्याचं गेल्या काही दिवसांत पाहायला मिळालं आहे. टीआरपीच्या दृष्टीकोनातून असे नवनवीन ट्विस्ट मालिकांमध्ये आणले जातात. या नव्या कलाकारांच्या एन्ट्रीमुळे मालिकेला एक वेगळं वळण मिळून प्रेक्षकांच्या मनात कथानकाबद्दल सुद्धा उत्सुकता निर्माण होते.

काही दिवसांपूर्वीच ‘ठरलं तर मग’ मालिकेत अभिनेत्री क्षिती जोगची एन्ट्री झाली होती. यानंतर ‘रानबाजार’ फेम अभिनेत्री माधुरी पवारने ‘येड लागलं प्रेमाचं’ या सिरियलमध्ये तर, अभिनेत्री अक्षया हिंदळकरने खलनायिकेच्या रुपात ‘अबोली’ मालिकेत एन्ट्री घेतली. या पाठोपाठ आता मालिकाविश्वातील आणखी एक लोकप्रिय अभिनेते लवकरच ‘कलर्स मराठी’च्या मालिकेत झळकणार असल्याची अपडेट समोर आली आहे.

‘कलर्स मराठी’ वाहिनीने अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर त्यांच्या एन्ट्रीबद्दल माहिती देऊन त्यांच्या भूमिकेचा पहिला लूक सर्वांबरोबर शेअर केला आहे. विविध मालिका, चित्रपटांमुळे घराघरांत लोकप्रिय झालेले अभिनेते स्वप्नील राजशेखर ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेत झळकणार आहेत.

स्वप्नील राजशेखर सध्या ‘झी मराठी’ वाहिनीच्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत चारुहासची म्हणजेच अधिपतीच्या बाबांची भूमिका साकारत आहेत. त्यांची भूमिका घराघरांत प्रचंड लोकप्रिय आहे. अक्षरा व अधिपतीला एकत्र आणण्यासाठी चारुहास सतत धडपड करताना दिसतात. काही करून सुनबाईंना ( अक्षरा ) परत घरात आणायचं यासाठी चारुहास प्रयत्न करत असल्याने त्यांना प्रेक्षकांचं विशेष प्रेम मिळतं. आता प्रेक्षकांचे हे लाडके अभिनेते नव्या भूमिकेत झळकणार आहेत.

‘आई तुळजाभवानी’ या मालिकेत स्वप्नील राजशेखर महिषासुराची भूमिका साकारणार आहेत. “आई तुळजाभवानीच्या क्रोधाग्नित जळालाय महिषासुराचा अहंकार, पण अधिक द्वेषासह घेतलाय त्याने नवा अवतार!” असं कॅप्शन देत कलर्स मराठी वाहिनीने स्वप्नील राजशेखर यांच्या भूमिकेच्या पहिल्या लूकचा फोटो सर्वांबरोबर शेअर केला आहे.

दरम्यान, ‘आई तुळजाभवानी’ ही मालिका ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर रात्री ९ वाजता प्रसारित केली जाते. स्वप्नील राजशेखर यांची भूमिका पाहण्यासाठी प्रेक्षक देखील आतुर झाले आहेत.