Tula Shikvin Changalach Dhada New Promo : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत अक्षरा आणि अधिपतीमध्ये दुरावा आल्याचा सीक्वेन्स चालू आहे. सतत होणाऱ्या भांडणांना कंटाळून अधिपती अक्षराला घर सोडून जाण्याचा सल्ला देतो. अक्षरा सुद्धा काहीही आक्षेप न घेता घराबाहेर पडण्याचा निर्णय घेते. सुनबाई घर सोडून गेल्याचं चारुहासला खूप दु:ख होतं. पण, दुसरीकडे भुवनेश्वरी मात्र यामुळे प्रचंड आनंदी होते.
आता काही केल्या अक्षरा आणि अधिपती पुन्हा एकत्र येणार नाहीत याची भुवनेश्वरी पुरेपूर काळजी घेत असते. अक्षरा मात्र काही करुन सासूचा खोटा चेहरा सर्वांसमोर कसा उघड करता येईल या प्रयत्नात असते. भुवनेश्वरीला अधिपती किंवा चारुहासबद्दल किंचितही प्रेम नसून तिला केवळ सत्ता मिळवायची असते हे अक्षराला ठाऊक असतं. त्यामुळे लवकरात लवकर भुवनेश्वरीचं कारस्थान सर्वांसमोर उघड करायचं असा निश्चय करून अक्षरा सूर्यवंशींचं घर सोडते.
हेही वाचा : भाजपा खासदार तेजस्वी सूर्या लोकप्रिय गायिकेशी बांधणार लग्नगाठ? कोण आहे ती? पंतप्रधान मोदींनी केलेलं कौतुक
अक्षरा माहेरी आपल्या आई-बाबांकडे येते. यावेळी तिला एक वेगळी गुडन्यूज मिळते. डॉक्टरांकडे चेकअप केल्यावर अक्षरा गरोदर असल्याचं समजतं. आपली लेक बाळाला जन्म देणार हे समजताच अक्षराचे आई-बाबा प्रचंड आनंदी होतात. त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. पटकन ही बातमी अधिपतीला सांग असा सल्ला अक्षराला पालकांकडून दिला जातो. पण, याला मास्तरीणबाई विरोध करते. आपण आताच घर सोडून आलोय…त्यामुळे आता लगेच जर अधिपतीला सांगितलं, तर त्यांना वाटेल मी घरी येण्यासाठी मार्ग शोधतेय या सगळा सारासार विचार करुन अक्षरा अधिपतीला थोड्या दिवसांनी सांगूया असा निर्णय घेते.
अखेर अक्षरा अधिपतीला फोन करणार आहे. ती अधिपतीला म्हणते, “मला तुमच्याशी बोलायचंय, एक महत्त्वाची बातमी द्यायची आहे.” पण, दुसरीकडे अधिपतीचा फोन भुवनेश्वरीने उचलला असल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. अक्षराच्या बोलण्यावरून भुवनेश्वरीला संशय येतो आणि ती डॉक्टरकडे गेल्याचं समजतं. त्यामुळे भुवनेश्वरी अक्षरा ज्या डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेलेली असते त्यांना जाऊन भेटते. आपल्या सुनेबद्दल विचारपूस करताच डॉक्टर समोरून भुवनेश्वरीचं अभिनंदन करतात आणि अक्षराकडे गूडन्यूज असल्याचं सांगतात.
अक्षरा आई होणार असल्याचं समजताच भुवनेश्वरीच्या चेहऱ्यावरचा रंग पूर्णपणे उडतो. कारण, दोघांचंही लग्न कायमस्वरुपी मोडायचं असा प्लॅन ती बनवत असते. या सगळ्यात जर अधिपतीला बाळाबद्दल समजलं तर तो नक्कीच मास्तरीण बाईंना पुन्हा घरी आणणार अशी खात्री भुवनेश्वरीला असते. आता सुनेच्या गरोदरपणाबद्दल समल्यावर ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत कोणतं वळण येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेची वेळ २३ डिसेंबरपासून बदलून रात्री १०.३० ची करण्यात आली आहे. मालिकेतील हा नवा ट्रॅक पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.