Tula Shikvin Changalach Dhada New Promo : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत सध्या अक्षराला वेडं ठरवण्यात आल्याचा सीक्वेन्स चालू आहे. चारुलताच्या रुपात घरी आलेली बाई दुसरी तिसरी कोणीही नसून भुवनेश्वरी असल्याची खात्री अक्षराला होते आणि सासूचं खरं रुप ती सर्वांसमोर आणते. मात्र, सूर्यवंशी कुटुंबीयांसमोर अक्षराला खोटं सिद्ध करायचं असा प्लॅन आधीच भुवनेश्वरीने आखलेला असतो. संपूर्ण घरासमोर अक्षराला खोटं ठरवून तिची रवानगी मेंटल हॉस्पिटलमध्ये करण्यात येते.
अक्षरावर याठिकाणी जेलमधला बजरंग हल्ला करण्यासाठी येतो. यावेळी अधिपती पत्नीच्या मदतीसाठी पोहोचतो. पण, त्यानंतर अक्षरावर हल्ला झालेला नसून ती केवळ मानसिक तणावापोटी काहीही बरळत असल्याचा आरोप हॉस्पिटलचे कर्मचारी तिच्यावर करतात. हे सगळेजण भुवनेश्वरीला मिळालेले असतात. यामुळे अक्षरा प्रचंड तणावात जाते. तिला गुंगीचं इंजेक्शन दिलं जातं. “मला काहीपण करून या दवाखान्यातून सोडवा” अशी विनवणी अक्षरा वारंवार अधिपतीकडे करत असते. पण, भुवनेश्वरी सर्वांना आपल्या जाळ्यात ओढून घेते.
एकीकडे अक्षरा रुग्णालयात असताना दुसरीकडे, घरात भुवनेश्वरी आणि चारुहासच्या लग्नाचा घाट घालण्यात येतो. सुनेच्या अनुपस्थितीत लग्न व्हावं अशी चारुहासची अजिबात इच्छा नसते. पण, चारुलता ( भुवनेश्वरी ) त्याचं मतपरिवर्तन करण्यात यशस्वी होते. आता ऐन लग्नाच्या दिवशी अक्षरा अधिपतीला घेऊन लग्नाच्या मांडवात येणार आहे.
भुवनेश्वरीचं रहस्य उलगडणार का?
भर मांडवात येऊन अक्षरा म्हणते, “थांबा! तुम्हाला अधिपती जिवापेक्षा प्रिय आहेत ना?” यावर चारुलता म्हणते, “अर्थात कोणत्याही आईला तिचा मुलगा प्रिय असतो.” पुढे अक्षरा म्हणते, “आता या प्रिय लेकाची शपथ घेऊन सांगा की, तुम्ही भुवनेश्वरी मॅडम नाही आहात…घ्या शपथ.” यानंतर चारुलता लेकाच्या डोक्यावर हात ठेवत असल्याचं पाहायला मिळतं. मालिकेत ( Tula Shikvin Changalach Dhada ) हा ट्विस्ट लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आता तरी भुवनेश्वरीचं खरं रुप प्रेक्षकांसमोर येणार का? याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.