टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या रोजच्या जीवनातील महत्त्वाचा भाग असतात. मनोरंजनाच्या साधनातील एक महत्त्वाचा भाग म्हणून टीव्ही मालिकांकडे पाहिले जाते. त्यातील काही मालिका प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी होतात. मालिकेच्या कथानकाबरोबर कलाकारांचा अभिनयदेखील तितकाच महत्त्वाचा ठरतो. नाट्यमय घडामोडींना आपल्या सहज अभिनयाने हे कलाकार प्रेक्षकांना खिळवून ठेवतात आणि पुढचा भाग बघण्यासाठी त्यांची उत्सुकता तशीच ठेवतात. आता अशाच काही मालिकांपैकी एक मालिका म्हणजे झी मराठीवर प्रदर्शित होणारी ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही आहे.

झी मराठी वाहिनीने, तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेचा प्रोमो इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवरून शेअर केला आहे.

प्रोमोच्या सुरुवातीला चारूलता आणि अक्षरा या दोघी घटस्थापनेची तयारी करीत असल्याचे दिसत आहे. चारुलता अक्षराला म्हणते, “घटस्थापनेच्या निमित्ताने आपण मातीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. मात्र, भुवनेश्वरीची बहीण दुर्गेश्वरी चारुलताने आणलेली माती घेते आणि म्हणते, “या घरात मी काहीही उगवू देणार नाही.” त्यानंतर ती माती आणि धान्य फेकून देताना दिसत आहे. चारुलता जेव्हा पूजेची तयारी केलेल्या ठिकाणी येते आणि तिला माती दिसत नाही. त्यावेळी ती विचारते, “माती दिसत नाही, धान्यही दिसत नाही.” त्यावर भुवनेश्वरीची आई म्हणते, “असं कसं होईल?” अधिपती म्हणतो, “वस्तू अशी घरातून कुणीकडं जाणार आहे?” त्यावर दुर्गेश्वरी म्हणते, “ताई नसताना तुम्ही हे जे काही करीत आहात, ते देवीलादेखील मान्य नाही.”

झी मराठी इन्स्टाग्राम

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “कुणाची असेल ही चाल…?”, अशी कॅप्शन दिली आहे.

काय म्हणाले नेटकरी?

हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने, “हाकलून द्या दुर्गी आणि चंचीला”, असे म्हटले आहे. दुसरा नेटकरी म्हणतो, “अक्षरा आणि चारुलतानं सडेतोड उत्तरं द्यायला हवीत.” एका नेटकऱ्याने म्हटले आहे, “किती ताडणार आता? ती भुवनेश्वरीच आहे.” आणखी एका नेटकऱ्याने कमेंट करीत लिहिले, “डायरेक्टरला एवढं कळेना की, घरची खरी मालकीण असताना त्या दुर्गी आणि चंचीला कशाला घरात ठेवलंय, दोघींना घराबाहेर काढायला पाहिजे.”

हेही वाचा: Video: “तुम्ही घर देतायत म्हणून…”, सूरजला सतत टोकण्यावरून निक्की-अंकितामध्ये भांडण; अभिजीत-पंढरीनाथमध्येही पडली वादाची ठिणगी

आता घटस्थापना कशी पार पडणार, अक्षरा-चारुलता यावर काही मार्ग शोधणार का, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. याबरोबरच अधिपती चारुलताचा आई म्हणून स्वीकार करणार का, भुवनेश्वरीला शोधण्याच्या त्याच्या प्रयत्नांना यश मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.