अशिक्षित अधिपती व शिकलेल्या मास्तरीणबाई म्हणजे अक्षरा व अधिपती यांची जोडी लोकप्रिय आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा'(Tula Shivin Changlach Dhada) मालिकेतील या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्यांची केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मने जिंकली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून अक्षरा व अधिपती यांच्यात दुरावा आला आहे. अधिपतीची आई भुवनेश्वरीच्या कारस्थानामुळे ते एकमेकांपासून दूर गेले आहेत. अधिपतीच्या मनात अक्षराविषयी काही गैरसमज निर्माण झाले आहेत. अक्षराला मात्र तिच्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. गेले अनेक दिवस त्यांच्यात नीट बोलणेही झाले नसल्याने त्यांच्यातील दुरावा वाढताना दिसत आहे. आता मात्र त्यांची भेट होणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेत आता मोठा ट्विस्ट येणार आहे. रंगपंचमीच्या निमित्ताने अक्षरा व अधिपतीचे बोलणे होणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की अधिपती व अक्षरा हे एकमेकांच्यासमोर आले आहेत. ते दोघेही एकमेकांना काहीतरी महत्वाचे बोलायचे आहे, असे सांगतात. अक्षरा अधिपतीला म्हणते, “ऐका ना, आपण खूप दिवसांनी भेटलोय अधिपती. मला तुमच्याशी बोलायचं आहे.” अधिपती म्हणतो, “मलाही तुमच्याशी बोलायचं आहे.” अक्षरा म्हणते, “मला खूप महत्वाचं बोलायचं आहे.” अधिपती त्यावर म्हणतो, “मलासुद्धा खूप महत्वाचं बोलायचं आहे. तुम्ही बोला.”

याच प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की दुर्गेश्वरी भुवनेश्वरीला सांगते की अक्षरा व अधिपतीची शाळेत भेट झाली आहे. भुवनेश्वरी तिला म्हणते, “सूनबाईंची वाट लावल्याशिवाय आम्ही काही शांत बसणार नाही.

तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेत दाखविल्याप्रमाणे, भुवनेश्वरीला अक्षरा अधिपतीच्या आयुष्यात नको आहे. अक्षराने भुवनेश्वरीचे सत्य उघड करत तिचे व चारूहासचे लग्न मोडले होते. त्याचा राग भुवनेश्वरीच्या डोक्यात आहे. त्यामुळे तिने अक्षराला अधिपतीच्या आयुष्यातून बाहेर काढण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. सुरूवातीला अधिपती व अक्षरामध्ये इतके गैरसमज निर्माण केले, त्यामुळे अक्षरा घर सोडून निघून गेली. मात्र, त्यानंतर अक्षरा व अधिपतीला त्यांच्यातील प्रेमाची जाणीव झाली. त्यांनी एकमेकांना भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र भुवनेश्वरीने त्यांना भेटून दिले नाही. जेव्हा जेव्हा भेट झाली, तेव्हा तेव्हा त्यांच्यातील बोलणे अर्धवट राहिले. अक्षराच्या मित्रामुळे अधिपतीच्या मनात गैरसमज वाढले. दुसरीकडे अक्षराने पुन्हा त्या घरात जाऊ नये, असा वडिलांनी तिला सल्ला दिला. ते घर तिच्यासाठी योग्य नसल्याचे तिच्या वडिलांनी तिला सांगितले. मात्र, अक्षरा तिच्या मतावर ठाम आहे, तिला अधिपतीला त्यांच्या होणाऱ्या बाळाबद्दल सांगायचे आहे. मात्र, कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांच्यात व्यवस्थित बोलणे होत नसल्याचे दिसते. दुसरीकडे, चारूहास म्हणजेच अधिपतीचे वडील त्याला वेळोवेळी सांगतात की अक्षराला परत घरी आण.

दरम्यान, आता अधिपती व अक्षरा हे एकमेकांना त्यांच्या मनातील सर्व सांगू शकणार का? अक्षरा अधिपती वडील होणार असल्याचे सांगणार का? कि भुवनेश्वरी तिच्या प्रयत्नांत यशस्वी होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Story img Loader