‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत सध्या प्रेक्षकांना नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. अधिपतीचे वडील म्हणजेच चारुहासची वाचा परत आणण्यासाठी अक्षरा खूप प्रयत्न करत असते. अखेर तिच्या प्रयत्नांना यश येऊन चारुहास बरा होतो. अक्षरा देवीसमोर प्रार्थना करत असताना तो सूनेला तथास्तू म्हणतो. सासऱ्यांना ठणठणीत बरं झालेलं पाहून अक्षरा फारचं आनंदी झाल्याचं गेल्या काही भागांमध्ये पाहायला मिळालं.
चारुहास अक्षराचे आभार मानताना सांगतो, “आपण लगेच बाहेर जाऊया, तुझी या घराला खूप जास्त गरज आहे. आता फक्त तूच आम्हाला या सगळ्यातून बाहेर काढू शकते. आज मी तुला भुवनेश्वरीचं सत्य सांगणार आहे.” सासऱ्यांचं म्हणणं ऐकल्यावर अक्षरा चकीत होते.
सूर्यवंशींच्या घराबाहेरच्या परिसरात जाऊन अक्षरा व चारुहास एकमेकांशी संवाद साधतात. यावेळी चारुहास सुनेला सांगतो, “वेळप्रसंगी भुवनेश्वरी अधिपतीला विष द्यायला सुद्धा कमी करणार नाही.” सासऱ्यांचं म्हणणं ऐकून अक्षराला धक्का बसतो. हे शक्य नाही असं तिला वाटू लागतं. यावर चारुहास पुढे म्हणतो, “भुवनेश्वरी त्याला विष देऊ शकते कारण, ती अधिपतीची खरी आई नाही. भुवनेश्वरी त्याची जन्मदात्री आई नाहीये.”
हेही वाचा : सुरुची अडारकर-पियुष रानडेची लग्नानंतरची पहिली ट्रिप! अभिनेत्री नवऱ्याचा फोटो शेअर करत म्हणाली…
चारुहासच्या पत्नीचं व अधिपतीच्या खऱ्या आईचं नाव चारुलता असं असतं. भुवनेश्वरी केवळ पैशांसाठी सूर्यवंशींचं घर उद्धवस्थ करते. त्यामुळे या संकटांतून अधिपतीला फक्त अक्षराच लवकरात लवकरत बाहेर काढू शकते असा विश्वास चारुहासला असतो. एकीकडे, अक्षरासमोर भुवनेश्वरीचं सत्य उघड होतं. तर, दुसरीकडे आजारपणाचं खोटं नाटक करून भुवनेश्वरी अधिपतीला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करणार असल्याचं पुढच्या भागाच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
आता अक्षरा यातून कसा मार्ग काढणार? आईसाहेबांच्या विरोधात बोलणाऱ्या अक्षरावर अधिपतीचा विश्वास बसेल का? याचा उलगडा आगामी भागांमध्ये होणार आहे. दरम्यान, मालिकेतील हे रंजक वळण पाहून सध्या प्रेक्षकांच्या मनात पुढे काय होणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.