‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ (Tula Shikvin Changlach Dhada)मधील अक्षरा व अधिपती यांच्यामध्ये काही दिवसांपासून दुरावा आल्याचे पाहायला मिळत आहे. झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारी तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका सततच्या ट्विस्टमुळे चांगलीच चर्चेत आहे. भुवनेश्वरीमुळे अधिपती व अक्षरा यांच्या दुरावा निर्माण झाला आहे. तो दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. ते दोघे कधीही पुन्हा एकत्र येऊ नयेत, यासाठी भुवनेश्वरी सतत कारस्थान करताना दिसते. आता समोर आलेल्या एका प्रोमोत चारुहास अधिपतीला अक्षराला गमावू नकोस, असे सांगताना दिसत आहेत. तर अक्षराचे वडील अधिपतीच्या घराला विसरण्याचा त्याला सल्ला देत आहेत.
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, चारुहास म्हणजेच अधिपतीचे वडील त्याला म्हणतात, “अक्षराला घरी परत घेऊन ये. अशाने अक्षराला कायमचा गमावशील.” याच प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, अक्षराचे वडील तिला म्हणतात, “आता मुद्दा हा आहे की, तू त्या घराला कायमचा राम राम ठोक.” हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे वागू शकेल का अक्षरा…?’, अशी कॅप्शन दिली आहे. आता अक्षरा वडिलांचे ऐकणार का, अधिपती चारुहासच्या म्हणण्याचा विचार करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत दाखविल्याप्रमाणे, भुवनेश्वरीला चारुहासबरोबर लग्न करायचे होते. त्यामुळे तिने चारुलता होण्याचे नाटक केले. या सगळ्यात अधितपतीने तिला मदत केली. मात्र, शेवटी अक्षराला भुवनेश्वरीचे सत्य समजले आणि तिने ते भुवनेश्वरी व चारुहासच्या लग्नावेळी सर्वांना त्याबद्दल सांगितले. त्यानंतर अक्षराला अधिपतीला आधीपासून हे माहीत असल्याचे समजले. त्यामुळे त्यांच्यात गैरसमज निर्माण झाले. भुवनेश्वरीच्या वागण्याची पद्धत चुकीची असल्याचे अक्षराने अधिपतीला वेळोवेळी समजावून सांगितले. मात्र, अधिपतीला भुवनेश्वरी चुकू शकत नाही यावर विश्वास असल्याने त्यांच्यातील गैरसमज वाढले. अधिपती-अक्षरामधील भांडणे वाढली आणि यामध्ये अक्षराने अधिपतीचे घर सोडले. त्यानंतर त्यांच्यातील गैरसमज वाढताना दिसत आहेत. अक्षरा-अधिपतीने अनेकदा भेटण्याचा प्रयत्न केला. काही वेळा त्याला भुवनेश्वरीमुळे अपयश आल्याचे दिसले. अक्षराचा जुना मित्र मदन परत तिच्या आयुष्यात आला असून, त्याच्या नावाचा वापर करीत भुवनेश्वरी अधिपतीच्या मनात अक्षराविषयी गैरसमज निर्माण करताना दिसत आहे.
दरम्यान, आता अक्षरा नेमकं काय करणार आणि अधिपती तिला घरी परत आणणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.