Tula Shikvin Changalach Dhada Director : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका जवळपास गेली दोन वर्षे प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. या मालिकेतील अधिपती, अक्षरा, भुवनेश्वरी या सगळ्याच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. पण, कोणत्याही मालिकेचं यश हे पडद्यावर काम करणाऱ्या कलाकारांप्रमाणे, पडद्यामागे कार्यरत असणाऱ्या मंडळींचं देखील असतं. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’, ‘नवरी मिळे हिटलरला’, ‘रंग माझा वेगळा’, ‘प्रेमास रंग यावे’ या गाजलेल्या मालिकांच्या दिग्दर्शनाची धुरा चंद्रकांत गायकवाड यांनी लिलया पेलली. पुरस्कार सोहळ्यामध्ये यासाठी त्यांचा सन्मान देखील करण्यात आलेला आहे.
पडद्यामागून गेली वर्षानुवर्षे प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारे चंद्रकांत गायकवाड यांनी नव्या वर्षाच्या मुहूर्तावर आपल्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. अलीकडच्या काळात अनेक सेलिब्रिटी अर्थार्जनासाठी अभिनय क्षेत्रात जम बसून विविध व्यवसायाकडे वळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. २०२४ मध्ये श्रेया बुगडे, अनुष्का पिंपुटकर, अक्षया देवधर, मृणाल दुसानिस, रेश्मा शिंदे, तेजस्विनी पंडित, आशिष पाटील अशा अनेक कलाकारांनी व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलं. आता २०२५ च्या सुरुवातीला लोकप्रिय मालिकांच्या दिग्दर्शकाने व्यवसाय क्षेत्रात आपलं पाऊल टाकलं आहे. याबद्दल पोस्ट शेअर करत त्याने माहिती दिली आहे.
चंद्रकांत गायकवाड यांनी मराठमोळे पदार्थ विकणारं क्लाउड किचन सुरू केलं आहे. त्यांच्या किचनचं नाव अन्नपूर्णा असणार आहे. “नवीन वर्षाची नवीन सुरुवात, गणपती बाप्पा मोरया! पारंपारिक जेवणाचं माहेरघर…अन्नपूर्णा.” असं म्हणत दिग्दर्शकाने नव्या व्यवसायचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. दिग्दर्शकाच्या क्लाउड किचनमध्ये पोटभर जेवण ताट, गावसन जेवण ताट, कोकणी जेवण ताट, गोडधोड, सलाड असे पदार्थ मिळणार आहेत.
क्लाउड किचन म्हणजे काय असा प्रश्न अनेकांना पडला असेल. क्लाउड किचन हे एक प्रकारचं हॉटेलचं असतं. पण, याचं संपूर्ण कामकाज ऑनलाइन पद्धतीने चालतं. खाद्यपदार्थांची चव आणि आधुनिक तंत्रज्ञान यावर हा व्यवसाय अवलंबून आहे. घरबसल्या आपल्याला क्लाउड किचनवरून ऑर्डर करता येते.
दरम्यान, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत अक्षराची भूमिका साकारणाऱ्या शिवानी रांगोळने पोस्ट शेअर करत दिग्दर्शकाला या नव्या व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.