‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ (Tula Shikvin Changlach Dhada) या मालिकेत काही दिवसांपासून रंजक गोष्टी घडताना दिसत आहेत. अक्षरा व भुवनेश्वरीमध्ये सतत वाद होताना दिसतात. भुवनेश्वरीचे सत्य समोर आणण्यासाठी अक्षरा धडपड करताना दिसते; तर अक्षरा व अधिपती यांच्यात जास्तीत जास्त दुरावा यावा यासाठी भुवनेश्वरी प्रयत्न करताना दिसते. अक्षरा अधिपतीच्या मनातील तिच्याविषयीचा गैरसमज दूर व्हावा यासाठी प्रयत्न करताना दिसते. तर, भुवनेश्वरी अधिपतीच्या मनात अक्षराविषयी गैरसमज निर्माण करताना दिसते. आता या सगळ्यात भुवनेश्वरीचा खोटेपणा उघड व्हावा, यासाठी अक्षराचे प्रयत्न सुरू असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे.
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अक्षरा एका शाळेतील मुलाशी बोलताना दिसत आहे. तो लहान मुलगा रडत रडत अक्षराला म्हणतो, “मॅडम मला खोटं बोलावं लागलं.” अक्षरा त्याला विचारते, “अरे पण का?” त्यावर तो मुलगा म्हणतो, “माझ्या आई-बाबांना दम दिला होता.” अक्षरा विचारते की, कोणी? तो मुलगा म्हणतो, “दुर्गेश्वरी मॅडमनी.” अक्षरा त्या मुलाला म्हणते, “तू मला आता जे काही सांगितलं आहेस, ते सगळ्यांसमोर सांगशील?” पुढे पाहायला मिळते की, भुवनेश्वरीची बहीण दुर्गेश्वरी त्या मुलाच्या घरी गेली आहे आणि त्यांना पैसे देत आहे. दुर्गेश्वरी म्हणते की, ही घ्या रोकड. त्या मास्तरीणबाईविरोधात पोलिसांत तक्रार करायची.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “अक्षराच्या सांगण्यावरून मुलगा सगळ्यांसमोर दुर्गेश्वरीचं सत्य सांगायला तयार होईल?”
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, भुवनेश्वरी अक्षराला त्रास देण्यासाठी अनेकविध गोष्टी करताना दिसत आहे. आता घरातून तिला बाहेर पडण्यास भाग पाडल्यानंतर आता तिला शाळेतून बाहेर काढण्यासाठी भुवनेश्वरीचे प्रयत्न सुरू आहेत. अधिपती व अक्षरा यांच्यामध्ये अबोला असला तरी त्यांना एकमेकांबद्दल काळजी वाटते, प्रेम वाटते. त्यामुळे अधिपती त्याच्या आईला अक्षराला शाळेतून काढू टाकू नका, अशी विनंती करतो. आता भुवनेश्वरीने शाळेतील संकेत नावाच्या मुलाच्या आई-वडिलांना धमकावून अक्षराविषयी खोटी तक्रार करण्यास भाग पाडले आहे. अक्षराने त्या मुलाला मारले, अशी तक्रार करण्यास सांगितले गेले. त्यानंतर अक्षराने तिने त्याला मारले नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, तरीही तिच्यावर आरोप करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. आता त्या मुलाने अक्षराला सत्य सांगितल्यानंतर तो तिच्या सांगण्यावरून दुर्गेश्वरी व भुवनेश्वरीबद्दल सगळ्यांसमोर उघडपणे बोलणार का, त्याचे आई-वडील दुर्गेश्वरीने दिलेले पैसे घेऊन अक्षराविरोधात तक्रार करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.