‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत अधिपतीची भूमिका साकारणाऱ्या ऋषिकेश शेलारने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या भरघोस प्रेमामुळेच ऋषिकेशला ‘झी मराठी अवार्ड्स’मध्ये सर्वोत्कृष्ट जावई व नायक अशा दोन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. आता घराघरांत अभिनेत्याला अधिपतीच्या नावाने ओळखले जात आहे. या सगळ्या यशाचं श्रेय अधिपतीने त्याच्या आयुष्यातील एका गोड व्यक्तीला दिलं आहे. तसेच तो यंदा दिवाळी सुट्टी कशी साजरी करणार याबद्दल त्याने खुलासा केला आहे.
हेही वाचा : राज ठाकरेंनी अमृता खानविलकरला पाठवली दिवाळीची खास भेट, अभिनेत्री आभार मानत म्हणाली…
ऋषिकेश दिवाळीबद्दल सांगताना म्हणाला, “शाळेच्या दिवसांमध्ये आम्ही सुट्टीत रायगड, राजगड अशा काही किल्ल्यांवर सहलीला जायचो आणि तिथे फराळ करायचो फक्त परिवारातील नाही तर कॉलनीमधली सगळी लोकं या सहलीला यायची. पण, आता शूटिंगमुळे हे सर्व शक्य नाही. मला आजही लक्षात आहे की, २०१७ ची दिवाळी साजरी करण्यासाठी मी कुटुंबासह अमेरिकेला गेलो होतो. आम्ही न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये बसून फराळ खाल्ला होता. त्यानंतर मग ब्रॉडवेत नाटक पाहिलं होतं. यावर्षी माझी दिवाळी मुंबईत माझ्या घरी साजरी होणार आहे.”
“यावर्षी दिवाळीत आई-बाबा घरी येणार आहेत. माझ्या मुलीची ही पहिली दिवाळी आहे. माझी रुही दहा महिन्यांची आहे आणि तिच्यामुळे यंदा आमची सर्वांची दिवाळी खास झाली आहे. पहिली बेटी धनाची पेटी असं म्हणतात, रूहीचं पाऊल घरात पडले आणि माझं आयुष्य बदलून गेलं. मला झी मराठीच्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेमध्ये पहिल्यांदाच नायकाची भूमिका साकारायला मिळाली.” असं सांगत लाडक्या लेकीला ऋषिकेशने त्याच्या यशाचं संपूर्ण श्रेय दिलं आहे.
हेही वाचा : शशांक केतकरने शेअर केला मरिन ड्राइव्ह परिसरातील जोडप्यांचा व्हिडीओ; म्हणाला, “हा गोंधळ…”
फराळाबद्दल सांगताना ऋषिकेश म्हणाला, “मला कडक चकल्या आवडतात त्यामुळे माझी आई खास माझ्यासाठी तशा चकल्या बनवते. मला सख्खी बहीण नाही पण, माझ्या मावस बहिणी माझ्या सख्ख्या बहिणी सारख्या आहेत. त्यामुळे दरवर्षी आमच्याकडे भाऊबीजेच्या दिवशी आमच्याकडे मटणाचा बेत असतो.”