अभिनेत्री शिवानी रांगोळे सध्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेमुळे चर्चेत आहे. यामध्ये मालिकेत अभिनेत्री शिक्षिका असलेल्या अक्षराची भूमिका साकारत आहे. मालिकेत अक्षरा-अधिपतीचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मिळवल्याने सध्या ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्यात सुद्धा याच मालिकेचा दबदबा पाहायला मिळाला.
मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळने अक्षरा, तर अभिनेता ऋषिकेश शेलारने अधिपती हे पात्र साकारलं आहे. ऋषिकेश यापूर्वी ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत खलनायकाची भूमिका साकारत होता. यानंतर ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये त्याला मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. शिवानीबद्दल सांगायचं झालं, तर तिने २०१२ मध्ये प्रसारित झालेल्या ‘झी मराठी’वरच्या ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. या जुन्या आठवणींना अभिनेत्रीने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करून उजाळा दिला आहे.
हेही वाचा : इन्स्टाग्रामवर फेक फॉलोवर्स विकणाऱ्या नेटकऱ्याला सिद्धार्थ चांदेकरचं रोखठोक उत्तर; म्हणाला, “तुलाच का…”
शिवानी रांगोळेला छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. तिच्या पोस्टमध्ये अभिनेत्री लिहिते, “२०१२ पासून ते आता २०२३ पर्यंत माझा छोट्या पडद्यावरचा प्रवास फारच अनोखा होता. या सगळ्या भूमिका साकारण्याची मला संधी मिळाली हे माझं भाग्य आहे. ज्या टीमबरोबर मी काम केलं त्या सगळ्यांचे मनापासून आभार! ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’, ‘बन मस्का’, ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर’, ‘आम्ही दोघी’, ‘सांग तू आहेस का’ आणि ‘तुला शिकवीन चांगलाच धडा…!”
हेही वाचा : ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत होणार नव्या पात्राची एण्ट्री, ‘हा’ अभिनेता साकारणार भूमिका
‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’ या मालिकेमुळे शिवानी घराघरांत लोकप्रिय झाली. यामध्ये तिने वैभव मांगले आणि विशाखा सुभेदार यांच्या ऑनस्क्रीन लेकीचं साकारलेलं महुआ हे पात्र प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. या मालिकेचं कथानक दोन विविध प्रांतातील कुटुंबावर आधारित होतं. ही मालिका ‘झी मराठी’वर २०१२ मध्ये प्रसारित केली जायची. सध्या शिवानी अक्षराच्या रुपात प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.