अभिनेत्री शिवानी रांगोळे सध्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेमुळे चर्चेत आहे. यामधील अक्षरा-अधिपतीच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेत अक्षरा-अधिपतीचा शाही विवाहसोहळा थाटामाटात पार पडला होता. अधिपतीशी लग्न झाल्यावर अक्षराचा मालिकेत काहीसा वेगळा लूक पाहायला मिळत आहे. साधीभोळी अक्षरा आता साडी, भरजरी दागिने, मोठी टिकली, हातात बांगड्या असा पारंपरिक लूक करुन सूर्यवंशींच्या घरात वावरु लागली आहे. याबद्दल नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री शिवानी रांगोळेने भाष्य केलं आहे.
अभिनेत्री शिवानी रांगोळेला ‘राजश्री मराठी’च्या मुलाखतीत स्वत:ला या नव्या लूकमध्ये पाहताना तुला नेमकं काय वाटतं? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ती म्हणाली, “मला असं वाटतं साड्या नेसण्याची आणि दागिने परिधान करण्याची आता माझी सर्व हौस फिटली आहे. जेवढी मी माझ्या स्वत:च्या खऱ्या लग्नात नटली नाही, तेवढी मी सध्या या मालिकेसाठी नटतेय. मला खरंच असं नटायला वगैरे खूप आवडतं आणि विशेषत: अक्षराचा लूक मला पहिल्या दिवसापासून आवडतो.”
हेही वाचा : ठरलं तर मग : अर्जुन ‘असा’ सिद्ध करणार साक्षी शिखरेचा खोटेपणा! समोर येणार मर्डर केसचं सत्य? पाहा नवा प्रोमो…
“सेटवर मला आता दागिने, साड्या या सगळ्या गोष्टींची सवय झालेली आहे. पण, अक्षरा या पात्राचं विचारालं तर तिला या सगळ्याची अजिबात सवय होत नाहीये. याचं कारण म्हणजे, अक्षरा ही सामान्य घरातील मुलगी असल्याने तिला सूर्यवंशींच्या घरात जुळवून घेणं जरा अडचणीचं जातंय.” असं शिवानी रांगोळेने सांगितलं.
दरम्यान, शिवानी रांगोळेच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तिने साकारलेल्या अक्षराच्या भूमिकेसाठी यंदाच्या झी मराठीच्या पुरस्कार सोहळ्यात तिला ३ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेपूर्वी तिने ‘आम्ही दोघी’, ‘बन मस्क’, ‘सांग तू आहेस का’ अशा बऱ्याच गाजलेल्या मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत.