कलाकार हे त्यांच्या अभिनयातून एखादे पात्र असे उभे करतात, की प्रेक्षकांना ते पात्र म्हणजेच अमुक एखादा कलाकार, असे वाटायला लागते. कलाकार त्यांच्या अभिनयकौशल्याच्या जोरावर पात्रे जिवंत करून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करतात. मात्र, कलाकाराचे आयुष्य हे या पात्रांपासून भिन्न असते. त्यांच्या खासगी आयुष्यातल्या अनेक गोष्टी चाहत्यांना माहीत नसतात. आता तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करताना दिसते. या मालिकेतील अधिपती व अक्षरा ही पात्रे आज घराघरांत पोहोचलेली दिसतात. अक्षराचे पात्र अभिनेत्री शिवानी रांगोळे, तर अधिपतीचे पात्र अभिनेता हृषिकेश शेलार(Hrishikesh Shelar)ने साकारले आहे. या मालिकेत अधिपतीचे पात्र अशिक्षित असल्याचे पाहायला मिळते. मात्र, खऱ्या आयुष्यात हृषिकेश शेलारचे शिक्षण किती झाले आहे, याबद्दल जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाला हृषिकेश शेलार?

अभिनेता हृषिकेश शेलारने नुकतीच ‘मित्र म्हणे’ या पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्याने त्याच्या अभिनयाच्या प्रवासाबद्दल, नाटकात काम करण्याच्या आवडीबद्दल वक्तव्य केले. त्याबरोबरच त्याने त्याच्या शिक्षणाबद्दलही सांगितले आहे. हृषिकेशने त्याच्या नाटकाच्या आवडीबद्दल बोलताना म्हटले, “माझी नाटकात काम करण्याची सुरुवात गणेशोत्सवात छोटी छोटी नाटुकली करण्यातून झाली. शाळेत सुरुवातीला अभ्यासात ४-५ वी पर्यंत बरा होतो. नंतर मला अभ्यासात गती आणि रुची वाटेना. मी लठ्ठसुद्धा होतो. ८-९ वीतच माझे वजन ९०-९२ किलो होते. त्यामुळे फार खेळातही नव्हतो. एकूणच अभ्यासाचा कंटाळा होता. जेव्हा शाळेतल्या गॅदरिंगमध्ये नाटक करायचो, तेव्हा छान वाटायचे. माझ्या मावशीचे मिस्टर गणेशोत्सवात सादर करण्यासाठी नाटुकली बसवून घ्यायचे. गणपती उत्सवात चांगलं झालं की, मग मी ते शाळेतही करायचो. गॅदरिंग आलं की शिक्षक वगैरे म्हणायचे की, त्या शेलारला बोलवा . तेव्हा वाटायचं की, आपल्याला यामध्ये गती आहे. तिथून सुरुवात झाली. पहिल्यांदा मी माझ्या घरच्यांना सांगितलं की, ही नाट्य शिबिराची जाहिरात आहे, मला तिथे घेऊन चला.”

याविषयी अधिक बोलताना अभिनेत्याने म्हटले की, १० वीचं वर्ष आल्यावर नाट्य शिबीर वगैरे बंद झालं. मला अभ्यासात अशीही रुची नव्हती. मला जेमतेम १० वीमध्ये ४६ टक्के असे काहीतरी मार्क्स पडले. ११ वीला विलिंग्डन कॉलेजला सायन्समध्ये प्रवेश घेतला. घरचे सगळे मेडिकल फिल्डमध्ये होते. त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की, तू सायन्सला अ‍ॅडमिशन घे. माझं त्यावेळी काही मत नव्हतं. मला फक्त नाटकच आवडायचं. १२ वीत मी फिजिक्स, केमिस्ट्री, इंग्रजी यामध्ये मी ३५-३५ मार्क्स पाडून मी काठावर पास झालो. माझी जी गँग होती, ती सगळी नापास झाली. मी एकटा पास झालो. माझं तेवढं होतं की, मी पास झालो पाहिजे. त्यानिमित्तानं मला बाहेर पडता येईल, असं वाटायचं. मला ३८.८३ टक्के मार्क मिळाले.

हृषिकेश शेलारने पुढे म्हटले, “मग मी घरच्यांना सांगितलं की, आता तुम्ही म्हणाल तसं केलं ना, तरी मला काही अभ्यासात रुची नाही. आता मला माझ्या मनासारखं करू दे. मग विलिंग्डन कॉलेजलाच बी.एस्सी.ला अॅडमिशन केलं आणि मग मी परत नाटकात सहभागी होऊ लागलो. सांगलीतले काही नाटकाचे ग्रुप जॉइन केले. एकांकिका स्पर्धा, इंटर कॉलेज स्पर्धा असे सगळीकडे सहभागी झालो. ‘सकाळ करंडक’मध्ये आमच्या कॉलेजने पहिल्यांदा सहभाग नोंदवला आणि तिकडे नंबर आला. पेपरमध्ये नाव छापून आलं. मी ग्रॅज्युएशनला मायक्रोबायोलॉजी बी.एस्सी.मध्ये फर्स्ट क्लासने पास झालो. शिक्षक चांगले होते आणि मला ते आवडू लागलं. संध्याकाळी नाटकाच्या तालमीला जाऊ लागलो. आपल्या आवडीचं करू लागलो की, आपल्याला तेवढी एक एनर्जी मिळते. मग मला अभ्यासातसुद्धा गती येऊ लागली. कॉपी वगैरे कधी केली नाही, अभ्यासच करून पास झालो. त्या फर्स्ट क्लासची मजा मला तेव्हा कळली. ३८ टक्के ते ६० टक्के हा माझ्यासाठी मोठा पल्ला होता. ते माझ्यासाठी बोर्डात येण्यासारखं आहे.”

हेही वाचा: माधुरी दीक्षित व गौरी खानने शेअर मार्केटमध्ये केली गुंतवणूक, कोणत्या कंपनीचे शेअर्स घेतले? वाचा

एकांकिका करताना पुण्यातील नाटकाच्या संस्कृतीबद्दल समजलं. तेव्हा पुण्यात जायचं ठरवलं. त्यानंतर एमबीएला व्हीआयटीला अॅडमिशन घेतलं. तिथे दोन वर्षे मार्केटिंगमध्ये एमबीए केलं. २०१२ ला मार्केटिंगमध्ये एमबीए पूर्ण झालं. कॅम्पस सिलेक्शन झालं. दोन-तीन कंपन्या दीड वर्षात बदलल्या. नाटकासाठी, स्पर्धांसाठी वेळ काढून पळायचो. चांगला पगार होता. २०१२ ला दर महिन्याचा सगळा खर्च भागून माझ्या अकाउंटला ४० हजार पगार असायचा. पण, मला त्यात काही मजा येईना. आपलं त्यात काही मन नाहीये, तर मन मारून किती करत राहणार, असं वाटलं. दोन दरडींवर पाय ठेवून जमणार नाही, हे समजलं. एक अंतिम निर्णय घ्यावा लागेल. मग घरच्यांना म्हटलं की, मला पूर्णवेळ अभिनेता म्हणून काम करायचं आहे आणि आता हेच वय आहे. मला परत पश्चात्ताप करायचा नाही. माझे वडील म्हणाले की, ठीकेय तू कर”, असे म्हणत हृषिकेश शेलारने त्याच्या अभिनयाचा प्रवास सांगितला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tula shikvin changlach dhada fame hrishikesh shelar reveals his 10th 12th percentage real life education also shares his acting journey nsp