‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. यंदाच्या ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळ्यात या मालिकेने बाजी मारत सर्वाधिक पुरस्कार मिळवले आहेत. या मालिकेतील अक्षरा-अधिपतीच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अक्षराची भूमिका अभिनेत्री शिवानी रांगोळेने साकारली आहे. छोट्या पडद्यावरील अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम करून शिवानीने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. यावर्षीच्या पुरस्कार सोहळ्यात तिने एकूण तीन पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं. यानंतर अभिनेत्रीने यंदाची दिवाळी कशी साजरी करणार याबद्दल खुलासा केला.
शिवानी म्हणाली, “माझ्यासाठी दिवाळीची आठवण म्हणजे माझ्या तीन मावशा आणि आम्ही सर्व भावंडं एकत्र येऊन फराळ बनवायचो. त्या सगळ्या गोष्टी मी फार मिस करते. यंदा मी कामात खूप गुंतलेली आहे पण, सुट्टी मिळाल्यावर सगळ्यात आधी मी आणि विराजस पुण्याला जाणार आहोत. कारण, माझं माहेर आणि सासर दोन्ही पुण्यातच आहे.”
“मालिकेच्या व्यग्र वेळापत्रकामुळे जर मला सुट्टी मिळाली नाही, तर मुंबईतच मी माझ्या सगळ्या मित्र मंडळींना घरी फराळासाठी बोलवणार आहे. मला फक्त दिवाळीची नव्हे तर भाऊबीजेची पण उत्सुकता असते कारण, तो एक दिवस आहे जेव्हा आम्ही सगळी भावंडं व्हिडीओ कॉलवर एकत्र संवाद साधतो. माझी बरीत भावंडं आता कामानिमित्त बाहेर आहेत त्यामुळे भाऊबीजेच्या निमित्ताने त्यांच्याशी बोलणं होतं. एकमेकांच्या आयुष्यात काय सुरू आहे याबद्दल जाणून घेता येतं. एकूण काय तर माझी दिवाळी मी मित्र मंडळी आणि परिवारासह साजरी करते.” असं शिवानी रांगोळेने सांगितलं.
हेही वाचा : राज ठाकरेंनी अमृता खानविलकरला पाठवली दिवाळीची खास भेट, अभिनेत्री आभार मानत म्हणाली…
दरम्यान, शिवानी रांगोळेच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेत्रीने खऱ्या आयुष्यात अभिनेता विराजस कुलकर्णीशी मे २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली. शिवानी कायम नवरा विराजस आणि सासूबाई मृणाल कुलकर्णी यांच्याबरोबरचे फोटो शेअर करत असते. नुकत्याच पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्याला विराजस आणि मृणाल कुलकर्णींनी शिवानीचं कौतुक करण्यासाठी उपस्थिती लावली होती.