शिवानी रांगोळे आणि ऋषिकेश शेलार यांच्या प्रमुख भूमिका असलेली ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेत शिवानीने ‘अक्षरा’, तर ऋषिकेशने ‘अधिपती’ ही भूमिका साकारली आहे. मालिकेच्या कथानकानुसार अक्षरा ही सामान्य कुटुंबातील मुलगी शाळेत शिक्षिका असते. याउलट अधिपती हा गर्भश्रीमंत आणि कमी शिकलेला मुलगा असतो.
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत एकीकडे अधिपतीचं अक्षरावर जीवापाड प्रेम असतं, तर दुसरीकडे अक्षराने फक्त तडजोड म्हणून हा संसार थाटलेला असतो. मालिकेत सध्या अधिपतीचे वडील आणि अक्षरामध्ये निर्माण होणाऱ्या गोड मैत्रीचा सीक्वेन्स सुरू आहे. आता आगामी भागांमध्ये अक्षराच्या मनात अधिपतीबद्दल प्रेमभावना निर्माण होईल का? याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे. याबद्दल नुकत्याच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत अधिपती आणि अक्षराने भाष्य केलं आहे.
अधिपती-अक्षरामध्ये प्रेम कधी खुलणार? असा प्रश्न दोघांना या मुलाखतीमध्ये विचारण्यात आला यावर ऋषिकेश म्हणाला, “सध्याच्या सीक्वेनवरुन दोघांमध्ये प्रेम खुलण्याचं कोणतंच चिन्ह दिसत नाहीये. सगळ्या गोष्टी अक्षराच्या मनाविरुद्ध घडत आहेत. अगदी हे लग्न सुद्धा…त्यामुळे सध्या प्रेम फुलेल असं मला तरी वाटत नाही.”
शिवानी रांगोळे याविषयी म्हणाली, “अक्षराचं प्रामुख्याने म्हणणं आहे मला शाळेत पाठवलं पाहिजे. तिला शाळेत नोकरी करण्याची परवानगी मिळाली की प्रेम वगैरे होईल. एवढ्यात ते शक्य नाही. आता मालिकेत हळुहळू मालिकेत बाबांची आणि अक्षराची मैत्री होत असल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल. अक्षराला देखील बाबांना मनापासून मदत करायची इच्छा आहे. पण, अधिपती आईच्या बाजूने असल्याने तो नेहमीच अक्षराला तुम्ही यात पडू नका असा सल्ला देत असतो.”
हेही वाचा : “मज्जाच गेली…”, नम्रता संभेरावची नाटकातून एक्झिट अन् नेटकरी झाले नाराज, विशाखा सुभेदार म्हणाली, “आधीच…”
दरम्यान, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका झी मराठी वाहिनीवर रोज ८ वाजता प्रक्षेपित केली जाते. यामध्ये शिवानी रांगोळे, ऋषिकेश शेलार, कविता मेढेकर, स्वप्नील राजशेखर या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.