‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या लोकप्रिय मालिकांमधून अभिनेता ऋषिकेश शेलार घराघरांत पोहोचला. मराठी मनोरंजनसृष्टीत त्याने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. सध्या घराघरांत ऋषिकेशला अधिपती म्हणून ओळखलं जातं. अभिनेता प्रमुख भूमिका साकारत असलेली ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका गेली दीड वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतल्या प्रत्येक पात्राने अल्पावधीतच प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अक्षरा-अधिपतीची जोडी घराघरांत विशेष लोकप्रिय आहे. या भूमिका शिवानी रांगोळे व ऋषिकेश शेलार यांनी साकारल्या आहेत. आज अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त शिवानीने एक खास पोस्ट व त्याच्यासह काही Unseen फोटो शेअर केले आहेत. ऋषिकेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शिवानी लिहिते, “ऋषी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! तुला आयुष्यात जे काही हवं असेल ते सगळं मिळो… तू घेत असलेली मेहनत, तुझी प्रचंड इच्छाशत्ती आणि तुझ्या मनाचा चांगुलपणा पाहून मला तुझा खूपच अभिमान वाटतो” यापुढे शिवानीने अभिनेत्याला एक मजेशीर सल्ला दिला आहे. कॅप्शनच्या पुढे मास्तरीण बाईंनी “बाकी चांगलं वागा” असं म्हटलं आहे.

हेही वाचा : बेताची परिस्थिती, नृत्याची आवड अन्…; ‘मी होणार सुपरस्टार…’मध्ये सख्ख्या भावांनी मारली बाजी, मिळालं ५ लाखांचं बक्षीस

शिवानीने या पोस्टबरोबर काही अनसीन फोटो शेअर केले आहेत. यातील पहिला फोटो ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेच्या सेटवरचा आहे. तर अभिनेत्रीने शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोमध्ये प्रेक्षकांना अक्षरा व अधिपतीच्या खऱ्या आयुष्यातील कुटुंबाची झलक पाहायला मिळत आहे. ऋषिकेश, त्याची पत्नी व मुलगी, शिवानीसह तिचा पती विराजस यांचा होळीच्या सणादिवशी काढलेला फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

हेही वाचा : ‘गद्दाराचे पुत्र’ म्हणणाऱ्यावर जावेद अख्तर भडकले, म्हणाले, “तुमचे पूर्वज ब्रिटीशांचे जोडे चाटत…”, नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

शिवानीने शेअर केलेल्या फोटोवर “थँक्यू शिवानी…” अशी कमेंट करत ऋषिकेशने अभिनेत्रीचे आभार मानले आहेत. याशिवाय नेटकऱ्यांनी या फोटोवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. “मॅडम लयभारी लिहिता तुम्ही”, “बेस्टफ्रेंड्स गोल्स…”, “दोघेही खूप गोड दिसत आहेत” अशा कमेंट्स अक्षरा अधिपतीच्या चाहत्यांनी या पोस्टवर केल्या आहेत.

दरम्यान, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर सध्या अक्षरा-अधिपतीचं प्रेम बहरत असून भुवनेश्वरीने दोघांना घराबाहेर काढल्याचा सीक्वेन्स मालिकेत चालू आहे. आता भुवनेश्वरीचा दोघांना वेगळं करण्याचा प्लॅन यशस्वी होणार की, अक्षरा-अधिपतीचं प्रेम जिंकणार हे आपल्याला आगामी भागांमध्ये पाहायला मिळेल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tula shikvin changlach dhada fame shivani rangole special birthday wish post for hrishikesh shelar sva 00
Show comments