अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर १९ नोव्हेंबरला विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ गडी राखून पराभव केल्याने संपूर्ण देशभरात सध्या नाराजीचं वातावरण पसरलं आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंसह लाखो क्रिकेटप्रेमी भारताच्या पराभवानंतर हळहळले. या अंतिम सामन्याबद्दल क्रीडा क्षेत्रासह राजकीय, मनोरंजन कलाविश्वातून दिग्गजांच्या प्रतिक्रिया येत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या अशाच एका मराठी अभिनेत्याची फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे.
विश्वचषक जिंकल्यावर ऑस्ट्रेलिया संघाचे वर्ल्डकपबरोबरचे आणि पार्टी करतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंग रुममधील एका फोटोने सर्वांचं लक्ष वेधलं. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मिशेल मार्श खुर्चीवर बसलेला असून त्याच्या हातात एक बाटली आहे. खुर्चीवर बसून त्याने चक्क विश्वचषकाच्या ट्रॉफीवर पाय ठेवल्याचं दिसत आहे. हा फोटो व्हायरल झाल्यावर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनी यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे.
हेही वाचा : “ते दोघंही…”, शेजारी विराट कोहली-अनुष्का शर्माच्या नात्याबद्दल कतरिना कैफ म्हणाली…
स्वप्नील राजशेखर लिहितात, “‘आपल्यावर’ पूर्वापार झालेले ‘संस्कार’…पृथ्वीतलावर अस्तित्वात असलेल्या प्रत्येकाने ग्राह्यच मानावेत…त्यानुसारच जगावं..अन्यथा… याच हट्टाग्रहाने जगात दहशतवाद आणला असेल ना…?!”
स्वप्नील राजशेखर यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी असंख्य कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने त्यांच्या पोस्टवर, “कधीतरी त्यांचा अहंकार त्यांनाच खाणार मार्क माय वर्ड्स…मान्य आहे की आमचा संघ चुकीचा खेळला पण क्रिकेटपासून मिळणाऱ्या प्रसिद्धीचा कधीही अपमान केला नाही.” अशी कमेंट आहे. तर, दुसऱ्या एका युजरने “माज आणि मस्ती दुसरं काय” असं कमेंटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, स्वप्नील राजशेखर यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ते ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत अधिपतीच्या वडिलांची भूमिका साकारत आहेत.