‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेतील अक्षरा-अधिपतीच्या जोडीला प्रेक्षकांनी अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक भागात प्रेक्षकांना नवीन काय पाहायला मिळणार? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या मालिकेत सध्या अक्षरा अधिपतीच्या वडिलांना गुपचूप मदत करत असल्याचा सीक्वेन्स सुरू आहे. अशातच आता नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’च्या नव्या प्रोमोमध्ये अक्षरा चारुहासला (अधिपतीचे वडील) डॉक्टरांच्या गोळ्यांमुळे त्रास होत असल्याची कल्पना अधिपतीला देते. तसेच आपण त्यांना मानसोपचार तज्ज्ञांकडे दाखवूया असा पर्याय ती अधिपतीला सुचवते. परंतु, अधिपती अक्षराचं कोणतंही म्हणणं ऐकून घेत नाही. तो सरळ आईसाहेबांवर शंका घेऊ नका आणि बाबांच्या भानगडीत पडू नका असा शेवटचा सल्ला अक्षराला देतो. मालिकेचा हा नाव प्रोमो सध्या चांगलाच चर्चेत आला. आता आगामी भागात प्रेक्षकांना मालिकेत आणखी काही ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत.
चारुहासला नेमका काय त्रास होतोय? आणि त्याच्या आजारपणाचं कोडं कसं सोडवायचं या विचारात अक्षरा गुंतलेली असते. याच दरम्यान चारुहास गुपचूप एक डायरी अक्षराला देतो. यात चारुहासला मदत हवी असल्याचं लिहिलेलं असतं. अक्षराला या सगळ्या प्रकाराबद्दल काहीच समजत नाही. म्हणून ती या सगळ्या घटनेची माहिती अधिपतीच्या आजीला देते. चारुहास कोणत्या तरी समस्येत आहेत असं ती आजीला सांगते.
हेही वाचा : रितेश देशमुखने सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला खास फोटो! जिनिलीयाची आई कमेंट करत म्हणाली…
अक्षरा चारुहासची चौकशी आणि त्याच्या विषयात लुडबूड करत असल्याचं पाहून भुवनेश्वरीचा संताप होतो. अक्षरा चारूहासची मदत करण्याचा आणखी एक प्रयत्न करते आणि त्याचवेळी अक्षरावर कोणीतरी हल्ला करतं. अक्षराच्या जीवावर नेमकं कोण उठलंय याबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. अक्षराचं चारुहासवरचं लक्ष विचलित करण्यासाठी भुवनेश्वरीचा हा नवा डाव असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता चारुहासची मदत अक्षरा कशी करणार आणि अक्षरावर नेमका कोणी हल्ला केला याचा उलगडा मालिकेत लवकरच होईल. तसेच या सगळ्यात अधिपती काय भूमिका घेणार तो बायकोला मदत करेल का? हे पाहणं देखील उत्सुकतेचं ठरणार आहे.